खडकवासला येथे सांडपाणी नाल्यात सोडल्याने दुर्गंधी, अनारोग्याची परिस्थिती
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे शहराच्या परिघावरील अन्य गावांप्रमाणेच खडकवासला येथे सांडपाणी व्यवस्थापन, कचरा, अतिक्रमण अशा समस्यांची तीव्रता वाढली आहे. त्याबाबत महापालिकेने प्राधान्याने कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.
गावात प्रवेश करतानाच ओढा लागतो त्यात गावातील सांडपाणी आणि कचरा अशा दोन्ही पद्धतीने घाण करून ओढ्याचे अक्षरश: गटार करण्यात आले आहे. गावात सगळीकडे भूमिगत गटारव्यवस्था झाली आहे तरीही अशा उघड्या जागेवर सांडपाणी सोडले जात असल्याने नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो आहे.
आता गावात नागरिकरणाने जोर धरला आहे. त्यामुळे टोलेजंग इमारती बांधल्या जात आहेत. अनेक इमारत अगदी एकमेकांना चिकटून बांधल्या गेल्या असल्याने आता यात नियमांचे मोठ्या प्रमाणावर उल्लंघन झाले आहे, अशी तक्रार गावकरी करतात. गावातील जागेवर अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले असल्याने याचा त्रास आम्हाला होतो, अशी भावना ज्येष्ठ नागरिकांनी बोलून दाखवली.
गावाला महानगरपालिकेच्या जलवाहिनीतून पाणीपुरवठा केला जातो. ज्या टाकीत गावासाठी पाणी साठवले जाते, त्या टाकीची अवस्था दयनीय झाली असून आजूबाजूला घाणीचे साम्राज्य आहे. त्यातच जलशुद्धीकरण केंद्र नसल्याने दूषित पाणी प्यावे लागत आहे.
गृहनिर्माण संस्थांचे प्रमाण गावात अजून कमी आहे. ज्या वेळेला सोसायट्या वाढतील तेव्हा संसाधनांवर ताण पडेल. त्यामुळे विलिनीकरणातून आम्हाला ठोस काही तरी मिळायला हवे, अशी मागणी गावकऱ्यांची आहे.
*कोट*
गेल्या दहा वर्षांत गावाचा वेगाने विस्तार झाला. मात्र उद्यान, क्रीडांगण तर सोडाच, साधे सार्वजनिक शौचालयही गावात नाही. महापालिकेने ही त्रुटी दूर करावी.
संजय जाधव, नोकरदार.
..............
पर्यटकांच्या दृष्टीने जिल्ह्यात आमचं गाव महत्त्वाचे असून त्यासाठी पायाभूत सुविधा व वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग असणे गरजेचे आहे. महापालिकेने त्यासंबंधी योग्य पावले उचलावीत.
-प्रमोद तेलावडे
नागरिक
................
फोटो ओळ
खडकवासला ग्रामपंचायत कार्यालयांच्या अगदी समोरच भरणाऱ्या भाजी मंडईमुळे वाहतूककोंडी होते.