औताडे-हांडेवाडीमधील महिलांचा सवाल
दीपक मुनोत
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : हडपसरला लागून असलेल्या औताडे-हांडेवाडीमध्ये महिलांचा सर्वाधिक वेळ पाणी आणण्यामध्ये जातो. टँकरही येतात, मात्र पुरेसे पाणी मिळत नाही. त्यामुळे विलिनीकरणानंतर पाणीप्रश्न प्रथम सोडवा, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.
औताडे-हांडेवाडी ग्रामपंचायतीचे २ कोटी रुपयांचे वार्षिक उत्पन्न आहे. गावची लोकसंख्या सुमारे दहा हजार आहे. मागील अनेक वर्षांपासून त्यांना पायाभूत सुविधा मिळालेल्या नाहीत.
गावातील महिलांना पाण्यासाठी वणवण करावी लागते. गावाजवळच्या महंमदवाडी, मंतरवाडी किंवा हडपसरमध्ये जाऊन पिण्यासाठी पाणी आणावे लागते. गावातील कूपनलिका आणि विहिरीतून तुटपुंजे पाणी मिळते तेही अशुद्ध आहे. त्यामुळे पाणी आणायचे कुठुन, असा प्रश्न नागरिकांसमोर आहे. मध्यम स्वरूपाच्या गृहनिर्माण सोसायट्यांना महिन्याकाठी किमान ६०० टँकर लागतात, असे गावकऱ्यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
आजूबाजूची गावे महानगरपालिकेत आहेत. त्यांना काही सोयीसुविधा मिळाल्या. त्यामुळे शासनाच्या या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो, पण पायाभूत सुविधा मिळाव्यात हीच ग्रामस्थांची प्रमुख मागणी आहे. गावात कचरा व्यवस्थापन यंत्रणा नाही, ग्रामपंचायतीच्या घंटागाड्या कचरा उचलून खासगी जागेवर टाकतात. तरीही गावात चोहीकडे कचऱ्याचे ढिगारे पडलेले आहेत. ग्रामपंचायतीकडून कचरा जाळला जात असल्याने त्यातून निघणाऱ्या विषारी धुरामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. गावात भूमिगत गटार आहे, मात्र सांडपाणी स्मशानभूमीजवळील नाल्यात तसेच सोडले आहे. काही ठिकाणी ड्रेनेज लाईन फुटल्याने सांडपाणी रस्त्यावरून वाहते. त्यामुळे, मध्यवस्तीत दुर्गंधी आणि अनारोग्याचे वातावरण तयार झाले आहे.
*कोट*
महापालिकेत गाव समाविष्ट व्हावे म्हणून आम्ही ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता, आता तीन महिने झाले प्रशासकामार्फत कामकाज पाहिले जात आहे. आता महापालिकेने पायाभूत सुविधांचा विकास करावा.
-हिम्मत हांडे, उपसरपंच.
कोट
पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सर्वात जास्त त्रासदायक आहे. हातची कामे सोडून बाहेरगावी पाणी आणण्यासाठी जावे लागते. महापालिकेने पिण्याच्या पाण्याची व्यवस्था प्राधान्याने करावी.
-लता खळदकर, ग्रामस्थ
फोटो ओळी
औताडे-हांडेवाडीमध्ये खासगी टँकरद्वारे मोठ्या प्रमाणात पाणीपुरवठा होत आहे.