पायाभूत सुविधांबाबत विरोधाभास नष्ट करण्याची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : बावधन बुद्रुक या गावात एकीकडे टोलेजंग इमारती, पंचतारांकीत क्लब तर दुसरीकडे मात्र पिण्याच्या पाण्याचे हाल, असा विरोधाभास आढळून येतो. रस्ते, ड्रेनेजबाबतही परिस्थिती फारशी समाधानकारक नसल्याची नागरिकांची तक्रार आहे.
महामार्गाच्या पलिकडे बावधन खुर्द तर दुसरीकडे बावधन बुद्रुक. बावधन खुर्द हे आधीच पुणे महापालिकेत आले असून बावधन बुद्रुकमध्ये मात्र अद्याप ग्रामपंचायत असून विलिनीकरण प्रस्तावीत आहे.
अर्थात बावधन खुर्दचा गेल्या दशकभरात ज्या वेगाने विकास झाला त्याचीच पुनरावृत्ती बावधन बुद्रुकमध्ये आज दिसून येते.
एकीकडे उच्च मध्यमवर्गियांच्या बंगले, संकुले, दुसरीकडे हातावर पोट असणारे श्रमिक. श्रीमंतांनी काही पायाभूत सुविधा मिळवल्या. श्रमिक मात्र त्यापासून आजही वंचित आहे. कात्रज- देहूरोड बाह्यवळण मार्गाच्या कडेला राहणारा हा वर्ग कुचंबणा सहन करीत जगत आहे. मागील काही वर्षांपासून बावधन बुद्रुकमध्ये पाण्याची टंचाई असून नागरिकांना पाण्यासाठी बावधन खुर्दमध्ये जावे लागते, अशी नागरिकांची तक्रार आहे. गावात दिवसाआड येणारे पाणी पुरेसे नाही. महापालिकेतील समावेशानंतर पाणीप्रश्न कायमचा मिटेल, अशी आशा गावकऱ्यांना आहे.
गावातील रस्त्यांच्या दर्जाबाबत नागरीक समाधानी नाहीत. वाढत्या लोकवस्त्या, त्यातील अतिक्रमण यामुळे रस्त्यावर आताच कोंडी आहे. मोठ्या संकुलांची कामे सुरू असल्याने ती पूर्ण झाल्यावर या संकटाची तीव्रता वाढणार आहे. प्रत्येक बाबतीत बावधन खुर्द बरोबर तुलना होत असल्याने सध्या येथील मध्यमवर्ग नाराज आहे. विलिनीकरणानंतर विकास कामांसाठी पालिकेकडून निधी मिळेल या अपेक्षेने ते विलिनीकरणाचे स्वागत करीत आहेत.
वारजे पुलाखाली झाले तसे सुशोभीकरण बावधनमधील पुलांचे व्हावे अशी नागरिकांची अपेक्षा आहे.
*कोट*
“पाण्याचा प्रश्नासह ८० % कामे मार्गी लागली आहेत. महापालिकेने एसटीपी प्लांट, उद्यान, उर्वरित पाणी नियोजन, कचरा व्यवस्थापनासाठी भरपूर निधी द्यावा.
-पियुषा दगडे पाटील, सरपंच.
कोट
एवढी मोठी ग्रामपंचायत असताना गावात सार्वजनिक स्वच्छतागृहे नसणे ही फार लाजीरवाणी बाब आहे. महापालिकेने याबाबत ठोस निर्णय घ्यावा.
-मंगेश सावंत, महाविद्यालयीन विद्यार्थी
फोटो ओळ : बावधनमधून जाणाऱ्या महामार्गालगत कचरा टाकला जात असून मोकाट जनावरे फिरत असल्याने वाहनधारकांना अडचण निर्माण होते.