पिण्याचे पाणी, एसटीपी, अनधिकृत बांधकामे हेच मांजरीत मोठे आव्हान
दीपक मुनोत
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : मांजरी बुद्रुक, शहराच्या पूर्वेकडील जोडलेले गाव. आता शहर आणि गाव असे त्यांचे वेगळेपणही करता येणार एवढी त्याची शहराबरोबर जवळीक निर्माण झाली आहे. पिण्याचे पाणी, कमी जागेत जास्त बांधकाम अशा समस्यांचा नागरिक सामना करीत आहेत.
१९९७ मध्येच मांजरी गाव महापालिकेत समाविष्ट झाले परंतु पुन्हा ते वगळण्यात आले. या पार्श्वभूमीवर या प्रक्रियेला राजकीय विरोध दिसत नाही. मात्र सामान्य नागरिकांच्या समाविष्ट होण्याबाबत संमिश्र भावना मांजरी बुद्रुकमध्ये दिसतात.
भौगोलिक क्षेत्र १०४८.३४ हेक्टर असलेल्या या गावची लोकसंख्या २०११ सालच्या जनगणनेनुसार ३६ हजार ८१६ होती. तिने एक लाखाचा टप्पाही केव्हाच ओलांडला आहे. रस्ते, वीज या पायाभूत सुविधा उपलब्ध असल्या तरी वेगाने होणारे नागरीकरण व अनधिकृत बांधकामे, पिण्याचे पाणी हे जटिल प्रश्न आहेत. गुंठ्यागुंठ्यात बांधलेल्या तीन-तीन मजली इमारती, जागोजागी खोदलेल्या विंधनविहिरी यामुळे भूजल पातळी प्रचंड खालावली असून आगामी काळात असंख्य विंधनविहीरी कोरड्या पडण्याची भीती आहे. येत्या काळात पाणीप्रश्न गंभीर होणार आहे. पिण्याचे पाणी, सांडपाण्याचा पुर्नवापर, मलनि:स्सारणासारखे मोठे प्रकल्प राबवणे ही ग्रामपंचायतीच्या आवाक्याबाहेरची गोष्ट आहे, म्हणूनच गाव महापालिकेत समाविष्ट झाल्यास, मोठे प्रकल्प राबवून विकासाचा मार्ग मोकळा होईल, अशीच भावना बहुसंख्य नेतेमंडळींची आहे.
कोट
“सुनियोजित विकासासाठी पेयजल योजना, कचरा व्यवस्थापन, मलनिसारण, सांडपाणी व्यवस्थापन यांसारख्या मोठे प्रकल्प ग्रामपंचायतीच्या माध्यमातून राबवणे अशक्य होते. महापालिकेत समाविष्ट झाल्यास असे प्रकल्प राबवणे शक्य होईल.”
- शिवराज घुले, सरपंच.
कोट
“या आधी समाविष्ट झालेल्या गावांनाच महापालिका सुविधा देण्यात असमर्थ ठरत असताना नव्याने समाविष्ट होत असलेल्या गावांची स्थिती काय होईलॽ
- अक्षय ढोरे, व्यावसायिक.
फोटो ओळ
अत्यंत धीम्या गतीने सुरू असलेल्या रेल्वे उड्डाणपूलाचे काम केव्हा पूर्ण होणार याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.