परिसरातील दगडखाणींमुळे किरकटवाडीतील नागरिकांना धुळ, डंपरचा त्रास
दीपक मुनोत / लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : किरकिटवाडी गावाशेजारी नांदोशी गावात दगडांच्या मोठ्या खाणी आहेत. त्याची वाहतूक किरकिटवाडीतल्या मुख्य रस्त्यावरुन होते. त्यामुळे धुळीद्वारे हवा प्रदुषण, मुख्य रस्त्याची दुर्दशा आणि वाहतुक कोंडी या समस्या गावात आहेत. गावातील मुख्य रस्त्यावर आधीच मोठी वळणे आहेत, त्यात अवजड वाहतूक होणार असेल तर हा रस्ता कसा टिकणार? असा प्रश्न गावकऱ्यांनी ‘लोकमत’कडे उपस्थित केला.
त्याच मुख्य रस्त्याचे काम पुणे महानगर प्रदेश प्राधिकरण (पीएमआरडीए) मार्फत सुरू असले तरी प्रचंड वाहतूक आणि अनेक बांधकामांमधून धूळ उडते. त्याचा गावकऱ्यांना मोठा त्रास होतो. वाढत्या लोकसंख्येमुळे पायाभूत सुविधा अपुऱ्या पडत आहेत. मुख्य रस्त्याला पर्यायी मार्गाची गरज आहे. किरकिटवाडी-खडकवासला-नांदोशी असा रस्ता झाल्यास वाहतूकीचा ताण कमी होईल असे गावकऱ्यांना वाटते.
गावात अंतर्गत रस्ते अतिशय उत्तम असून गल्लीबोळातही सिमेंट रोड असल्याने अंतर्गत रस्त्यांबद्दल गावकरी समाधानी आहेत. सांडपाण्याच्या व्यवस्थेसाठी ड्रेनेजची कामं वेगवेगळ्या भागात सुरू आहेत, तो ही प्रश्न लवकर मार्गी लागेल, अशी अपेक्षा गावकऱ्यांना आहे. सध्या मात्र सांडपाणी गावातील ओढ्यात सोडले जात असल्याने ओढ्याच्या परिसरात दुर्गंधी पसरली आहे.
गावाला पिण्याचे पाणी महापालिकेच्या जलवाहिनीतून येते. पाण्याची नवीन टाकी बांधली आहे पण जलशुद्धीकरण केंद्र नसल्याने ग्रामस्थांना स्वच्छ पाण्याची प्रतिक्षा आहे. गावातील कचरा उचलून गावाबाहेर नेला जातो.
स्वच्छतेची काळजी घेतल्याने गावाला ‘हागणदारीमुक्त गाव’ हा पुरस्कार मिळाला. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या सुशोभीकरणाचे काम सुरू असून अंगणवाडी डिजिटल करण्यात आली आहे. पायाभूत सुविधांच्या बाबतीत जरी किरकिटवाडीचा विकास झालेला असला तरीही हळूहळू वाढणाऱ्या अतिक्रमणामुळे बकालपणाी भीती गावकऱ्यांना आहे. महापालिकेमुळे निदान भविष्यातली अतिक्रमणे रोखली जातील या आशेने ग्रामस्थांनी विलिनीकरणाचे स्वागत केले आहे.
चौकट
गावात जलशुद्धीकरणाचे काम सुरू असून लवकरच ते मार्गी लागेल. मुख्य रस्त्याला पर्यायी मार्ग म्हणून नवीन रस्ता व्हायला हवा जेणेकरून वाहतूक कोंडी टाळता येईल.
-सुवर्णा करंजावणे पंचायत समिती सदस्य, हवेली
चौकट
मुख्य रस्त्याचे काम लवकर पूर्ण करा. कचरा गोळा करणारे नियमित येत नाहीत. संध्यांकाळी ऐन गर्दीच्यावेळी, भाजीविक्रेते रस्त्यावर ठाण मांडत असल्याने वाहनचालकांची मोठी गैरसोय होते.
- अखिलेशकुमार सिंग, नोकरदार