दीपक मुनोत
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कोंढवा आणि कात्रज अशा दोन विकसित गावांचा शेजार लाभलेल्या पिसोळीत पिण्याच्या पाण्यासह पायाभूत सुविधांची मोठी वानवा आहे. अन्य गावांच्या तुलनेत मोठ्या लोकसंख्येच्या या गावातील नागरिक विलिनीकरणाच्या अंतिम आदेशाची वाट पाहात आहेत.
गावात पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर आहे. जवळपास आठ दिवसानंतर पाणी येते ते ही अत्यंत कमी दाबाने. पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना कोंढवा किंवा कात्रजला यावे लागर्ते. जे पाणी आम्ही बाहेरून आणतो ते महाग पडत असल्याने आम्हाला ग्रामपंचायत असल्याचा उपयोग काय, अंतिम आदेशाची वाट न पाहता महापालिकेने तातडीने पाणीपुरवठा करण्यासाठी योग्य ती पावले उचलावीत, अशी मागणी नागरिकांनी ‘लोकमत’कडे केली.
भर गावातून जाणाऱ्या महामार्गाची अवस्था दयनीय असून अपघातांचे प्रमाण सातत्याने वाढत आहेत. सध्या या रस्त्याचे काम सुरू असून त्या कामामुळे रस्त्यावर अवजड वाहनांच्या लांबचलांब रांगा लागलेल्या असतात. या मुख्य रस्त्याला पर्यायी मार्गच नसल्याने नागरिकांना प्रचंड त्रास होतो. गावातील अंतर्गत रस्त्यांची कामेही अपूर्ण आहेत. गल्लीबोळातून तर साधी दुचाकी घेऊन प्रवास करणे शक्य नाहीये. ग्रामपंचायत कार्यालयाच्या इमारतीसमोरच मोठा राडारोडा पडला आहे. गावात नागरिकरण वाढत आहे, उत्तुंग इमारती बांधल्या जात आहेत, मात्र जर नियम पाळले गेली नाही तर पिसोळी बकाल होण्याची भीती गावकऱ्यांनी व्यक्त केली.
कोट
तांब्याभर पाण्यासाठी आम्हाला दहा रुपये मोजावे लागतात. ग्रामपंचायतीला वेगवेगळ्या योजनांसाठी मोठा निधी प्राप्त झाला असताना गावाच्या समस्या सुटल्या का नाहीत?
-चंद्रकांत एप्रे, जेष्ठ नागरिक
कोट
मागील अनेक वर्षांपासून गावात काडीमात्रसुद्धा विकास झालेला नाही. आता महापालिकेकडून आम्हाला विकासकामांची अपेक्षा आहे.
-आबासाहेब भिंताडे, जेष्ठ नागरीक
फोटो ओळी :
मुख्य रस्त्याचे काम सुरू असल्याने गावात दुतर्फा वाहतूक कोंडी होते. तासनतास अवजड वाहनांना मार्ग मिळत नसल्याने नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो.