बारामती: इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून भाजीपाला बाजार सुरू करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, हा बाजार दररोज सायंकाळी ५ वाजता सुरू होणार असल्याने परिसरातील शेतकऱ्यांचा वेळ वाचणार असून, सायंकाळी बाजार सुरू करणारी इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समिती जिल्ह्यातील पहिलीच बाजार समिती ठरली आहे.
इंदापूर शहरातील मुख्य बाजार समितीमध्ये सोमवारी (दि. ३०) या उपक्रमाचे उद्घाटन इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दत्तात्रय फडतरे यांच्या हस्ते करण्यात आले. इंदापूर तालुक्यामध्ये बहुतांश शेतकरी भाजीपाला पिके करत असतात. उजनी धरणालगतच्या पट्टा, नीरा नदीच्या परिसरात मोठ्याप्रमाणात तरकारी पिकांचे उत्पादन घेतले जाते. मात्र, हा भाजीपाला नारायणगाव, पुणे, नवी मुंबई, सोपापूर आदी बाजार समित्यांमध्ये पाठवला जात होते. दूर अंतरामुळे वाहतूक करताना शेतकऱ्यांना नुकसानीचा सामना करावा लागत होता. भाजीपाला नाशवंत असल्याने या सर्व प्रक्रियेमध्ये एकदोन दिवस उशिरा भाजीपाला बाजार समितीमध्ये पोहोचला जात असे. परिणामी, शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागत होते. या सर्वबाबींचा विचार करून इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने इंदापूर शहरातच भाजीपाला बाजार सुरू केला. या बाजारास शेतकऱ्यांकडूनही चांगला प्रतिसाद मिळाला आहे. जवळपास ८० आडते व्यापाऱ्यांनी सहभाग घेतला आहे. सायंकाळी बाजार सुरू केल्यामुळे दिवसभर तोडा केलेल्या फळभाज्या सायंकाळीच्या सुमारास बजारात लिलाव पद्धतीने विक्रीकरिता मांडल्या जातात. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला दर मिळण्यास मदत होणार आहे.
इंदापूर, बारामती, माढा, माळशिरस, करमाळा तसेच पुणे, सोलापूर,उस्मानाबाद, सातारा व अहमदनगर जिल्ह्यातील सर्व भाजीपाला उत्पादक शेतकरी, व्यापारी, वाहतूकदार यांची देखील भाजीपाला बाजार सुरू करण्याची अनेक दिवसांपासूनची मागणी होती. सदरील बाजारपेठ दररोज सायंकाळी ५ ते रात्री १० वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. या भाजीपाला बाजारच्या उद्घाटनप्रसंगी संचालक मधुकर भरणे, मेघशाम पाटील, संग्रामसिंह निंबाळकर,रोहित मोहोळकर, अंकुशराव रणमोडे, महावीर गांधी, सुभाष दिवसे, संतोष वाबळे, दत्तात्रय सपकळ, शिवाजी इजगुडे,भाऊसाहेब सपकळ, कृषी उत्पन्न बाजार समितीचे कर्मचारी,आडत व्यापारी,शेतकरी उपस्थित होते.
पुढील महिन्यात पानमळा, पेरू बाजार सुरू करणार...
इंदापूर तालुका हा सर्वाधिक फळबागा असणारा तालुका आहे. इंदापूर बाजार समितीचा डाळिंब बाजार सर्वत्र प्रसिद्ध आहे. या बाजारामुळे तालुक्यातील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना हक्काची बाजारपेठ मिळाली आहे. सध्या तालुक्यात पेरूबाग लागवडीखाली मोठे क्षेत्र आले आहे. तर उजनीच्या पट्ट्यात मोठ्याप्रमाणात पानमळ्याच्या लागवडी आहेत. येथील शेतकऱ्यांना देखील हक्काची बाजारपेठ मिळावी यासाठी पुढील काही दिवसांत पेरू आणि पानमळा बाजार सुरू करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने काम सुरू आहे.
- दत्तात्रय फडतरे
सभापती, इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समिती
इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने नव्याने सुरू करण्यात आलेल्या भाजीपाला बाजाराला पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळाला.
३१०८२०२१-बारामती-०३