पुणे : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र भाजीपाला व जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी गर्दी होत आहे. त्यातुन संसर्ग वाढण्याची शक्यता गृहीत धरून महापालिकेने नागरिकांना स्वस्तात भाजीपाला उपलब्ध व्हावा याकरिता आठवडे बाजाराच्या धर्तीवर ६८ ठिकाणी भाजीपाला उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. पालिकेच्या १५ क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीमध्ये नागरिक सुरक्षित अंतर ठेवून भाजीपाला खरेदी करू शकणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली. शहरात कोरोनाचा (कोविड १९) प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी सर्व गदीर्ची ठिकाणे बंद करण्याचे आदेश दिलेले आहेत. राज्यभरात कलम १४४ लागू करण्यात आले असून जमावबंदी घोषित करण्यात आलेली आहे. त्यामुळे ५ पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र असणे धोकादायक आहे. त्याअनुषंगाने कोरोना विषाणूचा (कोव्हिड १९) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महानगरपालिका हद्दीतील प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात भरविण्यात येणारे शेतकरी आठवडे बाजार सुरू ठेवण्यात येणार आहेत. या बाजारांमध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून सामाजिक अंतर (सोशल डिस्टनसिंग) ठेवण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.या कालावधीत नागरिकांना दैनंदिन वापरासाठी भाजीपाला घरपोहोच तसेच घराजवळील ठिकाणी उपलब्ध होण्याकरिता क्षेत्रिय कार्यालयनिहाय शेतकरी संयोजकांची यादी तयार करण्यात आलेली आहे.नागरिकांनी त्यांच्या दैनंदिन वापरासाठी आवश्यक त्या भाजीपाल्याची मागणी या शेतकरी संयोजकांकडे मोबाईलद्वारे संपर्क काळविल्यास घरपोहोच अथवा घराजवळील ठिकाणी पुरविण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. महानगरपालिकेच्या वेबसाईटवर याची सविस्तर माहिती देण्यात आली आहे.हा भाजीपाला हा थेट शेतकऱ्यांकडून उपलब्ध होत असल्याने दराबाबत व गुणवतेची जबाबदारी महानगरपालिकेची राहणार नाही, याची नागरिकांनी नोंद घ्यावी असेही स्पष्ट करण्यात आले आहे. याठिकाणी भाजी खरेदीला जाताना दोन व्यक्तींमध्ये तसेच विक्रेता व ग्राहकांनी योग्य अंतर ठेवावे असे आवाहन आयुक्त गायकवाड यांनी केले आहे.
पुणे महापालिका शहरात ६८ ठिकाणी करून देणार भाजीपाला उपलब्ध
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2020 7:49 PM
पालिकेच्या १५ क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीमध्ये नागरिक सुरक्षित अंतर ठेवून भाजीपाला खरेदी करू शकणार
ठळक मुद्देआठवडे बाजार : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपाययोजनाराज्यभरात कलम १४४ लागू करण्यात आले असून जमावबंदी घोषित