मंचर : तरकारी व भाजीपाला यांचे बाजारभाव कमी असल्याने महिलावर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे. शंभर रुपयांत पिशवीभर भाज्या घरी नेता येत असल्याने घरातील ‘बजेट’ चांगले जमूू लागले आहे. वांगी, फ्लॉवर, टोमॅटो, कोबी या भाज्या ५ रुपये पावशेर दराने मिळत आहेत. दुसऱ्या बाजूला पिकांना बाजारभाव नसल्याने शेतकऱ्यांचे मात्र नुकसान होत आहे. किरकोळ बाजारात तरकारी भाजीपाला यांचे भाव अजूनही कमी आहेत. शेतीमालाचे बाजारभाव कमीच असल्याने किरकोळ बाजारात तरकारी व भाजीपाला कमी भावाने विकला जातोय. बाजारात फेरफटका मारला, की कमी बाजारभावाची प्रचिती येते. घरातील महिन्याचे बजेट बसविताना भाजीसाठी केल्या जाणाऱ्या खर्चावर बरेच काही अवलंबून असते. भाज्यांचे दर वाढले, की काटकसर करून स्वस्तात मिळणारी भाजी विकत घ्यावी लागते अथवा कडधान्याची भाजी करावी लागते. कमी बाजारभावामुळे सध्या तरी तसे काही करावे लागत नाही, अशी प्रतिक्रिया महिलावर्गातून व्यक्त होत आहे. पालेभाज्यांचे दरही कमी असल्याने त्यांचा वापर वाढला आहे. मेथीची जुडी ४० ते ५० रुपयांना यापूर्वी मिळत होती. तीच आता ५ रुपयांना मिळू लागल्याने पालेभाज्या खाण्याचे प्रमाण वाढले आहे. याचा सर्वाधिक फायदा हॉटेल व्यावसायिकांना झाला आहे. राईसप्लेटमध्ये आता विविध प्रकारच्या भाज्या दिसू लागल्या आहेत. शिवाय, त्यांचा भाजीवरचा खर्च कमी झाला आहे. मंचरमध्ये ताजी भाजी ग्राहकांना मिळू लागली आहे, अशी माहिती विक्रेत्या शारदा गाडे यांनी दिली. शेतकऱ्यांना मात्र फटका : एकीकडे ग्राहकांचा फायदा होत असताना शेतकऱ्यांना मात्र मोठा फटका बसतोय. कमी बाजारभावामुळे त्यांचे पिकाचे भांडवलसुद्धा वसूल होत नाही. दोन वर्षांपासून शेतकरी अडचणीत आला आहे. बहुतेक पिकांना बाजारभाव मिळाला नसल्याने त्याची आर्थिक घडी बिघडली आहे. तो बाजारभाव वाढण्याची वाट पाहत आहे.तरकारी बाजारभाव पावशेरमध्ये : वांगी : ५ रुपये, फ्लॉवर : ५ रुपये, टोमॅटो : ५ रुपये, भेंडी : १० रुपये, वटाणा : ७ रुपये, कोबी : ३ रुपये, ढोबळी : १० रुपये, फरसबी : १० रुपये, गाजर : ५ रुपये, आले : ७ रुपये, बटाटा : १० रुपये किलो, कांदा १० रुपये किलो.
भाज्या बजेटमध्ये!
By admin | Published: February 26, 2017 3:36 AM