पुणे: वाचनाची आवड असेल तर ना वयाचा प्रश्न येताे, ना वेळेचा. राेजच्या कामातून वेळ काढून ती व्यक्ती हमखास वाचनाचा छंद जाेपासत असते. म्हणून ती इतरांपेक्षा वेगळी ठरते. याचाच प्रत्यय तळजाई टेकडीवर फिरायला येणाऱ्यांना येत आहे. सत्तरीतल्या आजी येथे भाजी विकता विकता वाचन करताना पाहून अनेक जण विचारपूस करीत आहेत. माेबाईलच्या दुनियेत अडकलेल्या तरुणाईला पुस्तक वाचण्याचा जणू त्या संदेशच देत आहेत.
या आजी मूळच्या साेलापूर जिल्ह्यातील माढा येथील. भागर्थी नेटके असे या आजीचे नाव आहे. त्या आजी सकाळच्या वेळी नियमित पेपर वाचत असतात. त्याबरोबर दिवाळी विशेष अंक, कथा, कादंबरी, कविता, महापुरुषांची पुस्तकेही वाचतात. सकाळच्या वेळी तळजाई टेकडीवर फिरण्यासाठी येणारे नागरिक आजींना वाचन करताना पाहून अचंबित होत आहेत. तसेच कुतूहलाने विचारपूरदेखील करत आहेत.
सध्याची तरुणाई सोशल मीडियात रमली आहे. वाचन करा म्हटले की कंटाळा करतात. पूर्वीची चौथी शिक्षण घेतलेली आजी मात्र आजही विना चष्मा वाचन करत छंद जपत आहेत. हे पाहून तळजाईवर फिरण्यासाठी येणारे नागरिक आवर्जून विचारपूस करीत आजीशी संवाद साधत आहेत.
''पूर्वी मी गावाकडेच शेतात काम करीत होते. वेळ मिळेल तशी वाचन करायची. मला वाचनाची आवड आहे. मुलगा पुण्यात राहताे. त्याला मदत म्हणून मी येथे आले. सकाळच्या वेळी तळजाई टेकडीवर भाजी विक्री करीत पेपर वाचत असते. येथे फिरण्यासाठी येणाऱ्या एका व्यक्तीने मला लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची कादंबरी आणून दिली. ती मी सध्या वाचत आहे. - भागर्थी नेटके, वाचनाचा छंद जपणाऱ्या आजी''