लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शनिपाराजवळ भाजीविक्री करणारी वृद्ध महिला. स्वतः असाध्य आजाराने ग्रस्त, पण नातवांच्या शिक्षणासाठी ठेवलेले लाख रुपये कोरोना निर्मूलन निधीला देत त्यांनी मोठ्या मनाचा आदर्श समाजापुढे ठेवला.
मालन नामदेव वणवे त्यांचे नाव. वय सत्तरीपार. राहायला लोअर इंदिरानगर. तिथून दररोज सकाळी निघून शनिपाराजवळ रस्त्यावर बसून भाजी विकतात. दोन मुले चरण आणि करण यातूनच मोठी केली. त्यांची लग्नं झाली. त्यांंना मुले झाली. प्रपंच छान चाललेला.
आजीने नातवांच्या शिक्षणासाठी ७५ हजार रुपयांची ठेव ठेवली होती. जवळ काही साठवलेले पैसे होते. खाऊनपिऊन सगळे सुखी होते. अशात आजीला असाध्य आजाराने गाठले. उपचार सुरू आहेत, पण यश येईना. त्यात कोरोना साथीने कहर केला. कायम माणसांमध्ये राहणाऱ्या आजींना स्वतःचा आणि समाजात पसरलेला हा आजार, असे सगळे समजत होते.
आजीने मोठ्या मनाने नातवांच्या शिक्षणासाठी ठेवलेली ठेव पावती मोडली व त्यात आणखी पैसे घालून १ लाख रुपये मुख्यमंत्री साहायता निधीला दिले. पुणे विभागाचे सह धर्मादाय आयुक्त सुधीरकुमार बुक्के यांनी यासाठी स्वतः आजींच्या घरी जाऊन सरकारच्यावतीने त्यांचे आभार व्यक्त केले. माणसाने माणसासाठी मदत नाही केली तर त्याला माणूस तरी कशाला म्हणायचे हे आजींचे जगण्याचे तत्वज्ञान आहे. तेच त्यांंनी बुक्के यांना ऐकवले आणि सुखी व्हा, असा आशीर्वादही दिला.