कोणतीही शेती न करता, अथवा कोणत्याही प्रकारच्या रासायनिक खतांचा वापर न करता, निसर्गतःच उगवलेल्या भाज्यांना रानभाज्या म्हणतात. या भाज्या जंगलात, शेतांच्या बांधावर, माळरानात येतात. पावसाची रिपरिप सुरू झाली की, रानभाज्याही डोकावू लागतात. या भाज्यांच्या चवीची आणि औषधी गुणधर्माची जाण असलेले त्यांच्याकडे पाठ फिरवित नाहीत. यात अनेक औषधी गुणधर्मही असतात. त्यामुळे रानभाज्या आवर्जून बनवून खाल्ल्या जातात. रानभाज्यांचे महत्त्व लक्षात यावे, यासाठी आदिवासी भागातील गावांमध्ये रानभाज्यांचे महोत्सवही भरविले जातात.
आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील बारा ज्योर्तिर्लिंगांपैकी एक असणाऱ्या श्री क्षेत्र भीमाशंकरच्या अभयारण्य परिसरात ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात रानभाज्या मोठ्या प्रमाणात आढळतात. अभयारण्याजवळील कोंढवळ व आहुपे या गावमध्ये या भागातील आदिवासी बांधव दुकान थाटून येणारे निसर्गप्रेमी हौशी पर्यटक व शहरी नागरिकांना माहिती नसलेल्या विविध प्रकारच्या रानभाज्यांची माहिती सांगतात.
रानभाज्या नेमकेपणाने ओळखून त्या खुडणाऱ्या आदिवासी महिला शहरी भागात बाजारात त्या विक्रीसाठी घेऊन येतात. मात्र, या रानभाज्यांची माहिती नसल्याने कोणी विकत घेण्यास लवकर तयार होत नाही. ज्या व्यक्तीला त्याची माहिती आहे, तीच व्यक्ती या भाज्या विकत घेताना दिसून येत आहे. रानभाज्यांबद्दल पुरेशी माहिती नसल्यामुळे इच्छा असूनही बाजारात त्या विकत घेतल्या जात नाहीत. त्यामुळे रानभाज्या विकत घेताना, शक्यतो स्थानिक आदिवासींकडूनच विकत घ्याव्यात. त्यांच्याकडूनच रानभाज्यांविषयी अचूक माहिती मिळते. ज्या भाज्यांमध्ये पानांचा समावेश अधिक आहे. त्या विकत घेतल्यानंतर त्या गरम पाण्यात उकळून ते पाणी टाकून द्यावे, त्यानंतरच या बनवाव्यात. या प्रक्रियेमुळे रानभाज्यांमधील अंगभूत गुणधर्म कमी होत नाही. भाज्या नैसर्गिक पद्धतीने वाढविलेल्या असतात अन् त्यांना खतेही वापरलेली नसतात, तसेच उकडून केलेल्या भाज्यांमध्ये शक्यतो कमी मसाले व तेलाचा वापर केल्यामुळे त्या आरोग्यासाठी पोषक ठरतात.
--
चौकट
सर्दी, खोकल्यासह मोठ्या आजारांवर गुणकारी
रानभाज्यांमध्ये काही भाज्या थंड तर काही उष्णधर्मीय असतात. खोकला, सर्दी, ताप, दम्यावर उपचार म्हणून वाकळीसारख्या रानभाज्या आवर्जून खाल्ल्या जातात. कुडा हा रानपाला पोटदुखीसाठी रामबाण उपाय मानला जातो, तर रानकेळ्यांमध्ये खोकला बरा करण्याची क्षमता असते. टाकळ्याची भाजी दिसायला मेथीसारखी मात्र अधिक कडवट-तुरट चवीची असते. टाकळ्याच्या पानाचा लेप विविध त्वचाविकारांवर लावतात. या भाजीला तखटा असेही म्हणतात. कोंब आलेली भारंगी, शेकट्यांच्या भाजीमध्ये प्रोटिन्स भरपूर प्रमाणात असतात. कुळू व कुवाळूचची भाजी ही गवतासारखी असते. त्यामुळे यात अनेकदा विषारी गवतही वाढते. कुवाळूचा मुळाकडचा भाग हा पांढराशुभ्र असतो. गवत हिरव्या गडद रंगाचे असते. विषारी गवताची पाती चपटी असतात. पातेरे, भारंग, बिंडासारख्या रानभाज्या बिनविषारी व सुरक्षित असतात. ज्या रानभाज्यांच्या पानांचा रंग गडद असतो, त्यांची चव थोडीशी तुरट व कडू असते. मात्र, त्यात पौष्टिक गुणधर्मही अधिक असतात. करटुलसारख्या काटेरी फळ असणाऱ्या भाजीमध्ये नैसर्गिक जीवनसत्व असल्यामुळे ती पचनास सोपी असतात. आघाडा, माळा, पुनर्नवा, कर्डू, मोरंगी, दवणा, काटेसावर, नारई, वाघोटी, टाकळा, आंबाडी, भोकर, खडकतेरी, भोवरी यांसारख्या भाज्यांमध्ये जस्त, तांबे, कॅल्शियम याचे प्रमाण अधिक असते.
---
फोटो १७ तळेघर रानभाज्या
तळेघर परिसरात फुललेल्या रानभाज्या
--