पुणे : भाजीपाला सर्वसामान्यांच्या आवक्याबाहेर गेला असून, किरकोळ बाजारात शेवगा आणि मटार तब्बल १६० रुपये किलो दर झाले आहे. तर भेंडी, टॉमेटो, वांगी सर्वंच फळभाज्या ८० च्या घरात गेल्या आहेत. कोथिंबीर ७० रुपये गड्डी व अन्य भाज्यांनी २० ते २५ रुपयांचा आकडा गाठला आहे. वाढलेल्या दरामुळे भाज्यांची खरेदी ‘नको रे बाबा’ म्हणण्याची वेळ सर्वसामान्यांनावर आली आहे.परतीच्या पावसामुळे भाज्यांचे मोठे नुकसान झाले आहे. ज्या भाज्यांची बाजारात आवक होत आहे त्याचा दर्जा चांगला नाही. हलक्या प्रतीच्या मालाला ग्राहकांकडून मागणी नाही. चांगल्या प्रतीच्या मालाचे प्रमाण कमी असल्याने फळभाज्यांच्या दरात मोठी वाढ झाली आहे. पालेभाज्यांची परिस्थिती सारखीच आहे. त्यामुळेच घाऊक बाजारापेक्षा किरकोळ बाजारात दरात मोठी वाढल्याने सर्वसामान्य ग्राहकांना वाढलेल्या दराचा फटका बसत आहे.घाऊक बाजारात पालेभाज्यांची विशेषत: जिल्ह्यातून आवक होत आहे. मात्र फळभाज्यांची आवक राज्य आणि परराज्यांतून होत आहे. बाजारात रोज ८० ते १०० ट्रक भाज्यांची आवक होत आहे. आवक वाढल्यानंतर किरकोळ बाजारात १० रुपयात पावभर मिळणाºया भाज्या आता कमीतकमी २० रुपये पावशेर झाल्या आहेत. दरात दुपटीने वाढ झाल्याने किरकोळ बाजारात भाज्यांची खरेदी करताना ग्राहकांना विचार करावा लागत आहे. पालेभाज्यांचे दरही तेजीत आहेत. चांगली कोथिंबीर ७०, मुळा ३०, मेथी २०, पालक २०, चाकवत २० आणि अंबाडीच्या गड्डीचे दर २० रुपयापर्यंत पोहोचले आहेत.किरकोळ बाजारात ग्राहकांची मागणी पूर्वीप्रमाणेच आहे. मात्र चांगल्या प्रतीच्या मालाची आवक घटली आहे. त्यामुळे दर वाढले आहेत. भाज्यांची आवक वाढल्यास दरात घट होईल. सद्य:स्थितीत मागणीच्या तुलनेत भाज्या उपलब्ध होत नाहीत. मुळात चांगल्या प्रतीच्या मालाचे घाऊक बाजारातच दर वाढले आहेत. त्याचा किरकोळ बाजारावर परिणाम झाल्याचे विक्रेते अभिषेक गावडे यांनी सांगितले.किरकोळ बाजारातील भाजीपाल्याचे दरभाजी दर (किलो)मटार १६० रुपयेशेवगा १६० रुपयेकोथिंबीर ७० रुपये (गड्डी)भेंडी ८० रुपयेटोमॅटो ८० रुपयेवांगी ८० रुपयेभाजी दर (किलो)गवार ८० रुपयेफ्लॉवर ८० रुपयेकोबी ८० रुपयेकारली ८० रुपयेदोडका ८० रुपयेसिमला मिरची ८० रुपये
भाजीपाला सामान्यांच्या आवाक्याबाहेर; फळभाज्या किलोला ८० रुपयांपेक्षा जास्त महाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 03, 2017 3:45 AM