पुणे : वडिलांच्या निधनानंतर अाईने भाजीपाला विकून परिस्थीतीशी दाेन हात केले. अापली परिस्थीती बदलायची हे ध्येय मनाशी बाळगत पुण्यातील बृहन्महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयाचा (बीएमसीसी) विद्यार्थी नारायण केंद्रे हा अाता चार्टर्ड अकाऊंटंट (सीए) झाला अाहे. त्याच्या या कष्टाचे अाता सर्वत्र काैतुक हाेत अाहे. पुण्यातल्या विद्यार्थी सहायक समितीचा त्याच्या यशात माेठा वाटा असल्याचे नारायण केंद्रे नमूद करताे.
मूळचा लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर तालुक्यातील आनंदवाडी गावचा असलेल्या नारायण केंद्रे याने अतिशय प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत सीएची परीक्षा नुकतीच उत्तीर्ण केली आहे. नारायण याचे वडील बाबूराव केंद्रे यांचे १९९७ मध्ये निधन झाले. नारायण त्यावेळी अवघ्या पावणेदोन वर्षांचा होता. पतीच्या मृत्यूमुळे तिन्ही मुलांचा सांभाळ करण्याची जबाबदारी आई आशाबाई यांच्यावर येऊन पडली. मुलांचे पालनपोषण करण्यासाठी अहमदपूर येथील भाजीमंडईत त्यांनी भाजीपाला विकण्याचा निर्णय घेतला. आजही भाजीमंडईत त्यांचे भाजीपाला विक्रीचे दुकान आहे. भाजीपाला विक्रीच्या दुकानावर नारायण बारावी होईपर्यंत नेहमी आईला भाजीपाला विक्रीसाठी मदत करायचा.
नारायणचे प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत, तर माध्यमिक शिक्षण रविंद्रनाथ टागोर विद्यालय अहमदपूर येथे झाले. त्यानंतर त्यानंतर उच्च शिक्षणासाठी तो पुण्याला आला व बीएमसीसी मध्ये प्रवेश घेतला. येथे विद्यार्थी सहायक समितीचा त्याला आधार मिळाला. एम. कॉम पूर्ण करून कॉमर्स या विषयात त्याने नेट परीक्षाही उत्तीर्ण केली आहे. आपली गरिबीची परिस्थिती बदलण्याची जिद्द त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. ‘इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया’मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत त्याने यश मिळवले. ग्रामीण भागात राहूनही यशाचे शिखर गाठणारा नारायण वेगळी वाट चोखळणाऱ्या तरुणांसाठी प्रेरणास्रोत बनला आहे. ग्रामीण भागातून शिक्षण घेऊन वेगळी वाट निवडून सी.ए. झालेल्या नारायणवर समाजाच्या सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
वडिलांच्या निधनानंतर आईने मोठ्या धीराने केलेला संघर्ष लहानपणापासून पाहत आलो आहे. त्याची जाणीव ठेवून नेहमी चांगले काहीतरी करण्याची जिद्द उराशी होती. आई, माझे गुरु, मित्र या सगळ्यांचा या यशात वाटा आहे. २०१३-१५ या कालावधीत विद्यार्थी सहायक समितीत असताना अनेक गोष्टी शिकता आल्या. त्याचा फायदा सीए करताना झाला. - नारायण केंद्रे, सीए
पतीच्या निधनानंतर तीन मुलांना वाढवण्यासाठी आजवर जे कष्ट उपसले त्याचे फळ आता मिळाले आहे. नारायणने मिळवलेले यश माझ्यासाठी आनंददायी क्षण आहे. मी उपसलेल्या कष्टाचे त्याने चीज केले याचे समाधान आहे.- आशाबाई केंद्रे, नारायणची आई.