पुणे : पुण्यातील नामवंत सराफाला धमकावून ५० कोटी रुपये मागण्याच्या प्रकरणात त्यांच्या घरातील वाहनचालकाला पोलिसांनी आज अटक केली. संदेश वाडकर असे त्याचे नाव आहे. दरम्यान, याप्रकरणाची संबंधित शिरुर तालुक्यातील एका राजकीय पक्षाचा नेतापैलवान यालाही पोलिसांनी गुरुवारी चौकशीला बोलावले होते. मात्र, आज हा पैलवान चौकशीसाठी आला नसल्याचे पोलीस उपायुक्त बच्चनसिंह यांनी सांगितले.
या प्रकरणी पोलिसांनी याअगोदर आशिष हरिश्चंद्र पवार (वय २७, रा. लक्ष्मीनगर, शाहू वसाहत, सहकारनगर), रूपेश ज्ञानोबा चौधरी (वय ४५, तुळशीबागवाले कॉलनी, सहकारनगर) आणि रमेश रामचंद्र पवार (वय ३२, रा. प्रेमनगर वसाहत झोपडपट्टी, मार्केटयार्ड) यांना अटक केली आहे. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत संदेश वाडकर याचा संबंध पुढे आला. संदेश हा त्यांच्या घरातील वाहनावर चालक म्हणून काम करतो. त्यामुळे त्याचे घरात येणे जाणे होते. या प्रकरणात जे व्हिडिओ चित्रिकरण करण्यात आले होते. तो कॅमेरा संदेश वाडकर याने लपविला होता. त्याला पोलिसांनी आज ताब्यात घेऊन अटक केली.
जिल्ह्यातील एक 'राजकीय पहिलवान' ५० कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणात संशयाच्या भोवऱ्यात अडकला आहे. संबंधित राजकीय पहिलवानाने फिर्यादीला फोन करुन भेटण्यासाठी बोलावले होते. त्या वेळी रुपेश चौधरी त्याच्यासोबत होता, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली.
रुपेश चौधरी हा या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या तीन आरोपींपैकी मुख्य म्होरक्या आहे. त्या राजकीय पहिलवानाने "तुमच्या जवळचे लोकच तुम्हाला त्रासदायक ठरणार आहेत. म्हणून येथून पुढे काही असेल, तर रुपेश चौधरीच माझ्या वतीने काम पाहील", अशी ओळख त्या सराफ व्यावसायिकाला करुन दिली होती. त्यानंतर सराफाला भेटलेला आशिष पवार हा रुपेश चौधरीच्या नावानेसराफाकडे खंडणीची मागणी करत होता. याप्रकरणी आम्ही संबंधित राजकीय पैलवानाला आज चौकशीसाठी बोलविले होते. मात्र, आज तो चौकशीसाठी आला नाही. चौकशीनंतर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.