पुणे : उच्च सुरक्षा पाटी (एचएसआरपी) बसविण्याचे बंधन करताना एप्रिल आणि मे या दोन महिन्यांच्या काळात काही वाहन विक्रेत्यांकडून नंबरप्लेट लावण्यात आल्या नाहीत. त्यामुळे अशा वाहनधारकांना आता नंबरप्लेट लावण्यासाठी अडचणी येत आहेत; परंतु आरटीओकडून अशा वाहनधारकांना सुरक्षा नंबरप्लेट बसविण्याची सोय सध्या सुरू असलेल्या पोर्टलवरच करून द्यावी, असे पत्र पुणे प्रादेशिक परिवहन विभागाने पाठविले आहे. त्यामुळे पुण्यासह राज्यातील हजारो वाहनधारकांना दिलासा मिळणार आहे.
परिवहन विभागाकडून १ एप्रिल २०१९ पूर्वीची नोंदणी असलेल्या सर्व वाहनांना उच्च सुरक्षा नंबरप्लेट लावणे बंंधनकारक केले आहे; पण, एप्रिल आणि मे २०१९ या दोन महिन्यांत घेतलेल्या काही वाहनांनाही नव्याऐवजी जुन्याच नंबरप्लेट बसविण्यात आल्या. त्यामुळे या नागरिकांची नव्याने नोंदणी होत नसल्याने करायचे काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे त्यांना सुरक्षा नंबरप्लेट बसविण्याची इच्छा असतानाही ती मिळत नाही; परंतु पुणे प्रादेशिक परिवहन विभागाने या वाहनधारकांचा प्रश्न सोडविण्यासाठी परिवहन विभागाला पत्र पाठविण्यात आले आहे. त्यानुसार एक एप्रिल २०१९ नंतर नोंदणी केलेल्या; पण सुरक्षा नंबरप्लेट न बसवलेल्या वाहनांचा प्रश्न सोडविण्याची मागणी केली आहे.
वाहनधारकांना दिलासा मिळणार
एप्रिल आणि मे २०१९ या दोन महिन्यांच्या काळात हजारो वाहनधारकांना उच्च सुरक्षा नंबरप्लेट बसविण्यात आलेली नाही. आता २०१९ अगोदरच्या वाहनांना सुरक्षा नंबरप्लेट बसविणे बंधनकारक केल्यानंतर या वाहनधारकांनी उच्च सुरक्षा नंबर पाटी बसविण्यासाठी प्रयत्न करत आहेत; पण त्यांना अर्जच करता येत नाही. शिवाय तुमचे वाहन नव्या नंबरप्लेटचे आहे, असा मेसेज येतो. त्यामुळे पुणे प्रादेशिक परिवहन विभागाकडून याबाबत परिवहन विभागाला पत्र पाठविले आहे. त्यामुळे वाहनधारकांना दिलासा मिळणार आहे.
एप्रिल आणि मे २०१९ या दोन महिन्यांतील वाहनधारकांना उच्च सुरक्षा पाटी लावण्यासाठी सध्या सुरू असलेल्या पोर्टलवरच सुविधा उपलब्ध करून द्यावी, याबाबत पत्र पाठविण्यात आले. त्यामुळे अशा वाहनधारकांची अडचण दूर होईल. - स्वप्नील भोसले, उप-प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे