पुणे : पालिकेसाठी भाडेतत्त्वावर वाहने (मारुती इको) पुरविण्यासाठी काढलेली निविदा भरलेल्या ‘ईगल कार्स’ या कंपनीला पालिकेने काळ्या यादीत टाकले आहे. निविदेतील दरानुसार वाहने पुरविण्यासाठी निविदा भरूनही प्रत्यक्षात निविदेत मात्र असमर्थता दर्शविण्यात आल्याने ही प्रक्रिया लांबल्याने ही कारवाई करण्यात आली. निविदेच्यावेळी भरण्यात आलेली बयाणा रक्कमही जप्त करण्याचे आदेश पालिकेच्या मोटार वाहन विभागाचे उप आयुक्त डॉ. महेश डोईफोडे यांनी दिले आहेत.
पालिकेला वाहने अपुरी पडत असल्याने वाहने भाडेतत्वावर भाडेकराराने घेतल्या जात आहेत. टुरिस्ट परवाना असलेली मारूती इको संवर्गातील वाहने घेण्यासाठी ऑनलाईन निविदा मागविली होती. मे. ईगल कार्स या कंपनीने सर्वात कमी अर्थात बिलो ९.३२ टक्के दर दिला होता. ही निविदा उघडल्यानंतर मात्र या कंपनीने सध्याची डिझेल दरवाढ, ड्रायव्हरचा पगार आणि वाहनांची देखभाल दुरूस्ती याचा विचार करता निविदेत नमूद दरानुसार काम करण्यास असमर्थ असल्याचे पत्र प्रशासनाला दिले.