पुणे: जुगाडाच्या गाड्या विक्रीचा प्रयत्न करणार्या तिघांना दरोडा व वाहन चोरी विरोधी पथकाने अटक केली. त्यांच्याकडून वाहन चोरीचे ५ तर मोबाईल चोरीचे १० गुन्हे उघडकीस आणले आहेत.
प्रशांत मधुकर भोसले (वय २०, रा. पालखी मार्ग, उरुळी देवाची), हसन इक्बाल शेख (वय २०, रा. पालखी मार्ग, उरुळी देवाची) आणि अभिषेक विलास पाडुळे (वय २१, रा. उरुळी देवाची) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
दरोडा आणि वाहनचोरी विरोधी पथक हडपसर भागात पेट्रोलिंग करत असताना पोलीस अंमलदार शिवाजी जाधव आणि मनोज खरपुडे यांना दोघे जण जुगाडाच्या दोन गाड्या विकण्याच्या तयारीत आहेत. कोणी विकत घेत असेल तर सांगा असे विचारत असल्याची माहिती मिळाली. त्यावरुन सासवड रोडवरील काळेपडळ येथे पोलिसांनी सापळा रचून तिघांना पकडले. त्यांच्याकडे चौकशी केल्यावर त्यांनी आकाश याच्या सोबतीने वाहन चोरीचे तसेच मोबाईल चोरीचे गुन्हे केल्याचे सांगितले.
त्यांच्याकडून हडपसर, कोंढवा, यवत, लोणी काळभोर, अंबोली (मुंबई)या भागातील वाहन चोरीचे ५ आणि मोबाईल चोरीचे २ गुन्हे उघडकीस आणले. तसेच १ लाख ८७ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. याशिवाय त्यांच्याकडून आणखी ८ मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. सहायक पोलीस निरीक्षक विवेक पाडवी आणि त्यांच्या पथकाने ही कामगिरी केली.