इंदापूर (सणसर) : मराठवाड्यातील दुष्काळावर मात करण्यासाठी इंदापूर तालुक्यातील नीरा नदीवरून बोगद्याद्वारे उजनी धरण व तेथून पुढे पाणी मराठवाड्यासाठी वळविण्यात येणार आहे. त्या प्रकल्पाचे बोगद्याचे काम सध्या सणसर येथील ३६ फाटा येथे सुरू आहे. त्यामुळे या प्रकल्पामुळे बाधित शेतकऱ्यांनी नीरा-भीमा जलस्थिरीकरण प्रकल्पाची वाहने सोमवारी ( दि. २१) अडविली.
काल रविवारी सपकळवाडी येथील शेतकऱ्यांनी नीरा-भीमा जल स्थिरीकरण योजनेचे बोगद्याचे काम सणसर हद्दीमध्ये ज्या ठिकाणी चालू होते तेथे जाऊन शेतकऱ्यांनी हे काम बंद पाडले. तेथील अधिकार्यांनीही हे काम बंद करत असल्याचे शेतकऱ्यांना सांगितले. मात्र सोमवारी सकाळी दहा वाजताच्या सुमारास मुरुमाने भरलेले टिपर हे प्रकल्पाचे ठिकाणावरून मुरूम यार्डाकडे भरून जाताना काही ग्रामस्थांनी पाहिले व तात्काळ त्या ठिकाणी ग्रामस्थ एकत्र येत वाहनाला आडवे येऊन उभे राहिले व शेतकऱ्यांनी वाहन पुढे न्यायचे नाही असे सांगून रस्त्यावर आडवे झोपण्याचा प्रयत्न केला. प्रकल्पाच्या ठिकाणी शेतकऱ्यांनी आंदोलन करूनही संबंधित ठेकेदार शेतकऱ्यांना न जुमानता काम करत आहे. त्यावरून शेतकरी आक्रमक झाले होते. यावेळी उमेश सपकळ,जगदीश सपकळ, आप्पा सपकळ यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
नीरा-भीमा जल स्थिरीकरण प्रकल्पाच्या कामासाठी भूसुरुंगाचा वापर केला जात आहे. त्याच्या धक्क्यामुळे परिसरातील घरांना तडे जात असून मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. तसेच या बोगद्यामुळे आमच्या विहिरींचे व बोअरवेलचे पाणी गेले आहे. हिवाळ्यातही विहिरींना पाणी कमी झाले आहे. त्यावरून येथील शेतकरी आंदोलन करत आहे. या विषयीकाल सर्व अधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आले होते. मात्र तरीही शेतकर्यांचा विरोध डावलून काम सुरू करण्याचा प्रयत्न ठेकेदाराकडून सुरू आहे.
शेतकऱ्यांनी सामंजस्यांची भूमिका घेत आंदोलन केले याचा अर्थ ठेकेदाराने वेगळा घेऊ नये. काम बंद करतो असे सांगूनही आज वाहनातून मुरूम भरून यार्ड कडे टाकण्याची गरजच नव्हती. आमचा संयम तुटू देऊ नये अन्यथा आंदोलनाला वेगळे वळण लागेल याची नोंद ठेकेदारांनी घ्यावी- सचिन सपकळ, सरपंच, सपकळवाडी.