लोकमत न्यूज नेटवर्क
नीरा :
शनिवारी संध्याकाळपासूनच नीरा पोलीस दूरक्षेत्रातील पोलिसांनी विनाकारण फिरणाऱ्यांची वाहन जप्तीच्या कारवाईला सुुरुवात केली. रविवारी सकाळी ही धडक कारवाई होत असल्याने वाहनचालक व पोलिसांत तू तू मैं मैं झाली.
पुरंदर तालुक्यातील वाढती कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेता. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी विनाकारण फिरणाऱ्या वाहनचालकांनवर दंडात्मक व कठोर कारवाई करण्यासाठी वाहने जप्त करण्याच्या सूचना दिल्या. यामुळे वाहने जप्त करण्यास सुरवात झाली आहे. शनिवार व रविवारी या दोन दिवसांत नीरा शहरात दुचाकीवरून भटकणाऱ्यांच्या २३ दुचाकी जप्त करण्यात आल्या. तर लॉकडाऊनच्या व कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ८ वाहनचालकांकडून ४ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. विनामास्क फिरणाऱ्यांकडून २ हजार रुपयांचा दंड वसूल करत सुमारे ६ हजार रुपयांची दंडात्मक वसूल झाले असल्याचे नीरा पोलीस दुरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक कैलास गोतपागर यांनी सांगितले.
गेली दोन दिवस वाहन जप्तीच्या कारवाईत सुरेश गायकवाड, सुदर्शन होळकर, राजेंद्र भापकर, संदिप मोकाशी, निलेश जाधव, हरिश्चंद्र करे, होमगार्ड मंगेश गायकवाड,भरत पिसाळ, अक्षय धायगुडे, सागर साळुंखे, सागर बरकडे,पोपट पाटोळे, पोलीस मित्र रामभाऊ कर्णवर यांनी सहभाग घेतला.
पुरंदर तालुक्यातील सासवड, जेजुरी, नीरासह आता खेडेगावतही पोलिसांनी वाहनचालकांवर कारवाईसह वाहने जप्त करण्यास सुरवात केली आहे. जप्त केलेली वाहने लॉकडाऊन असेपर्यंत पोलीस ठाण्यात लावली जातील, कुठल्याही परिस्थितीत ती वाहने वाहनमालकांना दिली जाणार नाहीत, याची खबरदारी घेतली जाणार आहे, असे मत नीरा पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक कैलास गोतपागर यांनी व्यक्त केले.
फोटोओळ : (१) नीरा पोलिसांनी मोकार फिरणाऱ्या वाहनचालकांवर कारवाईसह वाहने जप्त करण्यास सुरुवात केली. (छाया : भरत निगडे) (२) नीरा पोलीस दूरक्षेत्राच्या आवारात जप्त केलेल्या दुचाकी.