पुणे /धायरी : मोटारसायकलवरुन आलेल्या तिघा जणांनी १२ वाहनांची तोडफोड करुन दहशत माजविण्याचा प्रयत्न केला़ ही घटना सिंहगड रोडवरील वडगाव बुद्रुक परिसरात मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास घडली.वडगांव बुद्रुक परिसरात एका टोळक्याने दहशत माजवित १२ वाहनांच्या काचा फोडल्याप्रकरणी सिंहगड रस्ता पोलिसांनी परिसरातील सीसीटिव्ही कॅमेरे तपासले असता रात्री एकच्या दरम्यान एका मोटारसायकलवरून आलेल्या तीन तरुणांनी सदर परिसरातील वाहनांच्या काचा फोडल्या चे दिसून आले आहे.आरोपींच्या शोधार्थ पोलीस पथके रवाना झाली असून लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल असे सिंहगड रस्ता पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकिशोर शेळके यांनी ' लोकमत ' शी बोलताना सांगितले. तरुणांनी दारू पिऊन हे कृत्य केले असल्याचे काही नागरिकांनी लोकमत प्रतिनिधींशी बोलताना सांगितले. याबाबत अधिक तपास सिंहगड रस्ता पोलिस करीत आहेत.
वाहनांच्या तोडफोडीचे सत्र पुन्हा सुरू; नागरिक भीतीच्या छायेतमागील काही दिवसांपासून सिंहगड रस्ता परिसरात सुरू असलेले वाहन तोडफोडीचे सत्र काही केल्याने थांबण्याचे नाव घेत नाही. फेब्रुवारी महिन्यातच वडगांव बुद्रुक येथील तुकाई नगर परिसरात वाहनांची तोडफोड करीत दहशत पसरवीत गोळीबार केल्याची घटना घडली होती. तर मार्च मध्ये धायरी परिसरात चार वाहनांची तोडफोड करण्यात आली होती. सिंहगड रस्ता परिसरात पुन्हा टोळक्यांचा वाद निर्माण होऊन वाहने तोडफोडीचे सत्र दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. अशा तरुणांना पोलिसांनी वेळीच जरब बसविणे गरजेचे असल्याचे मत काही नागरिकांनी व्यक्त केले.लवकर मलमपट्टी केली नाही म्हणून क्लिनिकच्या काचा फोडल्याशनिवारी रात्री साडे आठच्या सुमारास वडगांव बुद्रुक येथील चव्हाण क्लिनिक मध्ये डॉ. पृथ्वीराज चव्हाण हे एका रुग्णावर उपचार करीत असताना एक तरुण केबिनमध्ये आला व म्हणाला की माझ्या करंगळीला दुखापत झाली आहे. मला लगेच मलमपट्टी करा. त्यावर डॉक्टरांनी अगोदरच रुग्णावर उपचार झाल्यानंतर तुमची मलमपट्टी करतो असे सांगितल्यावर बाहेर थांबलेल्या त्याच्या दोन मित्रांनी कोयत्याच्या साहाय्याने क्लिनिकच्या काचा फोडल्या. यामध्ये डॉक्टरांना थोडी दुखापत झाली असून याबाबत सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.