लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : दहशत निर्माण करण्याच्या हेतूने तडीपार गुन्हेगाराने त्याच्या साथीदारासह मोटारसायकलवरून येऊन एका तरुणावर तलवारीने वार करुन परिसरातील वाहनांची तोडफोड केली. ही घटना वडारवाडीतील महालेनगर येथे सोमवारी रात्री पावणेदहा वाजण्याच्या सुमारास घडली.
याप्रकरणी ज्ञानेश्वर साठे (वय ५५, रा. वडारवाडी) यांनी चतु:श्रृंगी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.
फिर्यादी हे त्यांच्या शेजाऱ्यांसह घरासमोर बसले होते. त्या वेळी दुचाकीवरून आलेल्या पाच ते सहा जणांच्या टोळक्याने हातात कोयते व तलवार घेऊन आरडाओरडा करत दहशत निर्माण केली. त्यानंतर फिर्यादीच्या वस्तीतील मुलगा आदित्य भोंडवे याला तलवारीने मारहाण केली. तसेच वस्तीतील नागरिकांनी रस्त्यावर लावलेल्या गाड्यांची तोडफोड करून नुकसान केले. यातील एक आरोपी हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. त्याला तडीपार करण्यात आल्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रेम वाघमारे यांनी सांगितले.