पुणे : सहकारनगर परिसरात टाेळक्यांनी गाड्यांची ताेडफाेड केल्याची घटना ताजी असतानाच आता पुन्हा एकदा सिंहगड रस्ता परिसरात रस्त्यावर लावण्यात आलेल्या दुचाकी ढकलून पाडून त्यांचे नुकसान करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. सिंहगड राेडवरील विविध ठिकाणी या घटनेची पुनरावृत्ती झाली. या घटनांमुळे पुणेकरांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून पुण्यात वाहनांची ताेडफाेड करण्याचे तसेच वाहने जाळण्याचे प्रकार घडत आहेत. शहरातील विविध भागांमध्ये असे प्रकार घडत आहेत. मधल्या काही काळात पाेलिसांनी रात्रीची गस्त वाढविल्याने हे प्रकार कमी झाले हाेते. परंतु पुन्हा एकदा शहरात आता रात्रीच्यावेळी टाेळक्यांकडून वाहनांच्या नुकसानीचे प्रकार सुरु झाले आहेत. रविवारी सहकारनगर परिसरात टाेळक्यांनी तब्बल 41 वाहनांची ताेडफाेड केली हाेती. यात दुचाकी, रिक्षांचा समावेश हाेता. आता पुन्हा एकदा सिंहगड रस्ता परिसर रस्त्यावर लावलेली वाहने ढकलून त्यांचे नुकसान करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
सिंहगड रस्ता परिसरातील विठ्ठलवाडी, वरद हाऊसिंग सोसायटी, सुजाता मस्तानी जवळील परिसर, विश्रांती नगर, तरडे कॉलनी आदी भागातील दुचाकी ढकलून खाली पाडण्यात आले आहेत. यामध्ये गाड्यांचे किरकोळ स्वरूपात नुकसान झाले आहेत. मात्र, गाड्या पाडल्यामुळे परिसरात दहशत पसरली आहे. याबाबत नागरिकांमधून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. संबंधित घटनेची सिंहगड पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सिंहगड पोलीस करीत आहेत.