मार्गासनी: वेल्हे तालुक्यात बीएसएनएलला महिन्यात केवळ सहा दिवसच रेंज मिळत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे नागरिकांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. दरम्यान, सेवा सुरळीत सुरू न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा संघटक संतोष दसवडकर यांनी बीएसएनएलच्या वेल्हे येथील कार्यालयास टाळे टोकण्याचा इशारा एका प्रसिद्धिपत्रकात दिला आहे.
वेल्हे येथे सर्व शासकीय कार्यालये आहेत. यामध्ये वेल्हे तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन, पंचायत समिती कार्यालय, वनविभागाचे कार्यालय, ग्रामीण रुग्णालये, वेल्हे, नोंदणी व मुद्रांक शुल्क कार्यालय पोस्ट आदी कार्यालयांचे कामकाज आनलाईन पद्धतीने चालत आहे. परंतु वेल्ह्यात बीएसएनएलला रेंज मिळत नसल्याने सर्वांची कामे रखडली आहेत. शासनाने झीरो पेंडन्सी धोरण जरी राबविले असले, तरी वेल्ह्यात मात्र बीएसएनएल मुळे सर्वच कामे पेंडिंगवर आहेत. वेल्हे पोलीस स्टेशनची सीसीटीएनएस सेवा देखील कोलमडली आहे. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीमध्ये काम करणे अवघड झाले आहे.
ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्राची कामे देखील रखडली आहेत. येथील केंद्रांना दररोज नियमित अहवाल वरिष्ठांना पाठवावा लागत आहे. तसेच वेल्हे येथे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक आणि बॅंक आफ महाराष्ट्र या दोन बॅंका आहेत. या ठिकाणी बीएसएनएलची रेंज गायब असल्याने व्यवहार कायमच बंद असतात. त्यामुळे वेल्हेकरांची आर्थिक पिळवणूक होत आहे. तसेच नोंदणी व दुय्यम निबंधक कार्यालयातील अनेक नोंदींचे दस्त देखील बीएसएनएलच्या सेवेमुळे महिनाभरापासून ठप्प आहेत. या कारणास्तव जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार देखील बंद आहेत. कोट्यवधीचा महसूल देखील शासनाचा यामुळे बुडाला आहे.
विद्यार्थ्यांना लागणारे उत्पन्नाचे दाखले, रहिवासी दाखले, गॅप सर्टिफिकेट आदी दाखल्यांसाठी नागरी सुविधा केंद्रात विद्यार्थ्यांनी एकच गर्दी केलेली असते. परंतु बीएसएनएलच्या भोंगळ कारभाराचा विद्यार्थ्यांना देखील फटका बसत आहे. तसेच, वेल्हे तालुक्यात केवळ एकच वरिष्ठ महाविद्यालय आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा सर्व पत्रव्यवहार हा आनलाईन झाला आहे. अहवाल पाठविणे, विद्यार्थ्यांचे निकाल पाहणे, आनलाईन माहिती भरणे ही नियमित कामे करावी लागत आहेत. पण, बीएसएनएलच्या भोंगळ कारभारामुळे येथील कामकाज कोलमडले आहे. वेल्हे येथे बीएसएनएलचे कार्यालय आहे, परंतु हे कार्यालय कायमच बंद असते या ठिकाणी एकही कर्मचारी नाही. नियमित बीएसएनएलच्या केबलमध्ये बिघाड होत असल्याने येथे एकही कर्मचारी उपलब्ध नसतो. या कार्यालयात कर्मचाऱ्यांची भरती त्वरीित करावी अशी मागणी माजी पंचायत समिती सदस्य संतोष दसवडकर यांनी केली आहे.