लोकमत न्यूज नेटवर्क
डेहणे : जिल्ह्याचे शेवटचे टोक व घाटमाथ्यावरील शेवटचे गाव असलेल्या वेलवळी (ता. खेड) गावाचा अतिवृष्टीमुळे जगाशी संपर्क तुटला आहे. येथील तीस ते चाळीस कुटुंबांची दळणवळणाची सोय नसल्याने उपासमार होऊ नये, यासाठी तातडीने रस्ता दुरुस्ती होणे गरजेचे आहे.
भोरगिरी परिसरातील डोंगरावर असलेले वेलवळी गाव भीमा नदीच्या पलीकडे असल्याने या गावात कुठलाही विकासाचा मागमूसही नाही. विज नाही, पाण्याची सोय नाही, शाळा नाही, आरोग्य केंद्राचा कुणी कर्मचारी फिरकत नाही, अशा परिस्थित गावकरी दळणवळणासाठी या एकमेव रस्त्यावर अवलंबून असतात. विशेष म्हणजे हा रस्ता पायथ्याशी संपतो. तेथुन पुढे एक तास पायपीट करत डोंगर चढुन गावात पोहोचता येते. अतिवृष्टीमुळे चिखल व पूर यामुळे ही आदिवासी वस्ती संकटात सापडली आहे. या गावाला तातडीने प्रशासनाने मदत करावी अशी, मागणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विठ्ठल वनघरे यांनी केली आहे. पुलाच्या भरावाचे काम तातडीने न झाल्यास ऐन पावसाळ्यात अन्न धान्या बरोबर आरोग्याच्या मोठा प्रश्न वेलवळीकरांपुढे आहे.
फोटो : वेलवळी (ता. खेड) येथील भीमा नदीला जोडणाऱ्या रस्तावरचा पुलाचा वाहून गेलेला भराव.