पुणे: जमिनीपासून १८ ते २२ मीटर उंचीवरून धावणाऱ्या मेट्रोच्या स्थानकानजिकच्या खांबांवर व्हर्टिकल गार्डन करण्यात येणार आहे. दोन खांबांच्या मधील रस्त्यावरच्या जागेतही दुभाजक टाकण्यात येणार असून त्यात फ्लॉवर बेड तयार करण्यात येणार आहे.मेट्रो प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून ही माहिती देण्यात आली. मेट्रो चे सगळेच काम शोभीवंत दिसावे यासाठी महामेट्रोकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यातूनच स्थानकांजवळच्या खांबांवर व्हर्टिकल गार्डन (खांबांचा आधार घेत त्यावर प्लॅस्टिकच्या कुंड्यांमध्ये लावलेली फुलझाडे) तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. फक्त सिमेंटचे खाब रुक्ष दिसतील, त्याऐवजी स्थानकाला शोभून दिसतील म्हणून त्याच्यावर आता अशा कुंड्या लावण्यात येणार आहेत. मेट्रोच्या प्रत्येक स्थानकामध्ये पुणे शहराची वैशिष्ट्ये दिसतील याची काळजी घेण्यात आली आहे. त्यातूनच एका स्थानकाला बाहेरच्या बाजूने पगडीचा आकार तर दुसऱ्या स्थानकाला विणेचा आकार देण्यात आला आहे. दुरवरून पाहिल्यावर स्थानकाचे हे आकार लगेचच लक्षात येतील अशी त्याची रचना करण्यात येणार आहे. त्याचे आरेखनही तयार करण्यात आले आहे. ते करताना ज्याठिकाणी स्थानक असेल तिथे त्याला अनुसरून आकार देण्यात येणार आहे. मेट्रोचे खांब मेट्रो मार्गावरील रस्त्याच्या बरोबर मध्यभागी आहेत. दोन खांबांमध्ये साधारण २३ ते २७ मीटरचे अंतर आहे. त्यामधून वाहनांची ये-जा होऊ नये यासाठी ही जागा दुभाजकाने बंद करण्यात येणार आहे. एरवीच्या रस्त्यावर असतो तसा हा दुभाजक नाही. तो उंच व रुंदीने कमी असा आहे. त्याच्या मधील जागेत फ्लॉवर बेड ( फुलझाडे) तयार करण्याचे महामेट्रोचे नियोजन आहे. संपुर्ण मेट्रो मार्गावरच असे शोभीवंत दुभाजक तयार करण्यात येणार आहे.
पुण्यात मेट्रो स्थानकाजवळच्या खांबांवर 'व्हर्टिकल गार्डन'
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2019 8:09 PM
मेट्रोच्या प्रत्येक स्थानकामध्ये पुणे शहराची वैशिष्ट्ये दिसतील याची काळजी घेण्यात आली आहे.
ठळक मुद्देदुभाजकांमध्ये फ्लॉवर बेड : निगराणी असणार पालिकेकडेवाहनांची ये-जा होऊ नये यासाठी ही जागा दुभाजकाने बंद करण्यात येणार संपुर्ण मेट्रो मार्गावरच असे शोभीवंत दुभाजक तयार करण्यात येणार