पुणे : “कोरोनाची दुसरी लाट ओसरत असतानाच राज्यात रक्ताचा तुटवडा जाणवू लागला आहे. या पार्श्वभूमीवर लोकमतचे संस्थापक स्व. जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रभर रक्तदान पंधरवडा आयोजित करण्यात आला आहे. या राज्यव्यापी मोहिमेत प्रत्येक संवेदनशील व्यक्तीने रक्तदान करावे,” असे आवाहन ज्येष्ठ काँग्रेस नेते उल्हास पवार आणि भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले.
‘रक्ताचं नातं’ या रक्तदान मोहिमेचे उद्घाटन शुक्रवारी (दि. २) लोकमतच्या वडगाव येथील कार्यालयात करण्यात आले. यानंतर पवार आणि पाटील बोलत होते. आमदार माधुरी मिसाळ, भाजपाचे सरचिटणीस राजेश पांडे, सामाजिक कार्यकर्ते युवराज शहा, उद्योजक अमित गायकवाड, नगरसेवक प्रसन्न जगताप, सामाजिक कार्यकर्ते किशोर पोकळे, संतोष शेलार, किशोर कुलकर्णी, राहुल जोशी आदी या वेळी उपस्थित होते.
पाटील म्हणाले की, महाराष्ट्राच्या उभारणीत ज्या कुटुंबांचे योगदान आहे, त्या राज्यातल्या पहिल्या दहा कुटुंबांमध्ये दर्डा परिवाराचे नाव घ्यावे लागते. स्वातंत्र्य मिळवण्यात आणि स्वातंत्र्यानंतर देशाच्या सक्षम उभारणीसाठी दर्डा कुटुंबीयांनी योगदान दिले आहे. उल्हास पवार यांनी सांगितले, “बाबूजींनी मला खूप प्रेम दिले. नागपूर अधिवेशनासाठी गेल्यानंतर बाबूजी सर्व पक्षांच्या नेते-कार्यकर्त्यांना घरी बोलवत. स्वातंत्र्यसेनानी ते यवतमाळचे नगराध्यक्ष आणि तेथून राज्याच्या मंत्रिमंडळातील विविध जबाबदाऱ्या अशी मोठी झेप त्यांनी घेतली.”
लोकमतचे समूह संपादक विजय बाविस्कर, पुणे आवृत्तीचे संपादक प्रशांत दीक्षित, वरिष्ठ महाव्यवस्थापक निनाद देसाई यांनी उपस्थितांचे स्वागत केले. आचार्य आनंदऋषीजी पुणे ब्लड सेंटर यांच्या सहयोगाने ‘लोकमत’ कार्यालयात झालेल्या पहिल्याच रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
चौकट
“सध्याच्या कोविड संकटात लोकमतने एक लाख रक्त बाटल्या संकलनासाठी हाती घेतलेली रक्तदान मोहीमसुद्धा याचेच उदाहरण आहे. सध्या कोरोनाच्या साथीमुळे थांबलेल्या कोविड व्यतिरिक्तच्या अन्य शस्त्रक्रिया, उपचार आता वेगाने सुरू झाल्याने राज्यात रक्ताची मोठ्या प्रमाणात गरज आहे. त्या पार्श्वभूमीवर लोकमतची मोहीम खूप गरजेची आहे. भाजपाच्या राज्यातल्या सर्व कार्यकर्त्यांना तसेच नागरिकांना मी आवाहन करतो की लोकमतच्या रक्तदान मोहिमेत सहभागी व्हा. या रक्तदान यज्ञात मागे राहू नका.”
- आमदार चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष, भाजपा
चौकट
“लोकमतने हाती घेतलेली रक्तदान मोहीम ही सद्यस्थितीत अत्यावश्यक असणारी लोकचळवळ आहे. राज्यातील रक्ताचा तुटवडा लक्षात घेता मोठ्या संख्येने लोकांनी रक्तदानासाठी पुढे येण्याची गरज निर्माण झाली आहे. पूर्वी रक्तदानाबद्दल खूप गैरसमज होते. मात्र आता लोकांमध्ये पुरेशी जागृती आली आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी लोकमतच्या रक्तदान मोहिमेत सहभागी व्हावे. एखाद्याचा जीव वाचवण्याचे पुण्याचे काम तुमच्या रक्तदानामुळे होणार आहे.”
-उल्हास पवार, ज्येष्ठ काँग्रेस नेते.
चौकट
हे आवर्जून लक्षात घ्या
-कोरोनाबाधित झाल्यानंतरचा विलगीकरणाचा कालावधी संपून अठ्ठावीस दिवस झाल्यानंतर रक्तदान करता येते.
-कोरोना लसीचा पहिला किंवा दुसरा डोस घेतल्यानंतर चौदा दिवसांनी रक्तदान करता येते.
-१८ ते ६० या वयोगटातील प्रत्येक निरोगी स्त्री-पुरुष रक्तदान करु शकतो.
-रक्तदानामुळे शरीराचे कोणतेही नुकसान होत नाही, उलट नव्या रक्तनिर्मितीस चालना मिळते.
चौकट
‘लोकमत’सोबत रक्तदान शिबिर घेण्यासाठी संपर्क
गणेश गंगाळे, पुणे शहर व जिल्हा : ८८८८७५८६७६
रोहन भोसले, पिंपरी : ९६०४६४४४९४