------
सोमेश्वरनगर : ग्रामपंचायत करंजे (ता. बारामती) येथील मागावर्गीय मुलांकरिता बांधलेली अभ्यासिका चोरीस गेली असल्याचे माहितीच्या अधिकारात उघड झाले आहे.
करंजे (ता. बारामती) येथील रहिवासी राकेश गायकवाड यांनी माहिती अधिकारात करंजे येथील अभ्यासिकेबाबत माहिती मागविली होती. त्यामध्ये दोन लाख ५१ हजारांच्या निधीतून अभ्यासिका इमारत बांधली असल्याची माहिती दिली. मात्र प्रत्यक्षात इमारत गावात कुठेच नाही; त्यामुळे राकेश गायकवाड यांनी थेट पोलीस ठाणे गाठून पोलिसांना अभ्यासिकेची इमारत चोरीला गेल्याची तक्रार दिली.
तक्रारीत म्हटले आहे की, माहिती अधिकाराखाली मागितलेल्या माहितीद्वारे असे निदर्शनास आले की, ग्रामपंचायत करंजे यांनी अभ्यासिकेच्या नावाखाली २ लाख ५१ रुपयांचा निधी काढला आहे. सदरची बिले व बांधकाम पूर्णत्वाचे मूल्यांकनपत्र यासोबत जोडत आहे. चोरीस गेलेल्या बांधकामाचे मूल्यांकन पंचायत समिती बारामती बांधकाम विभागाचे सब डिव्हिजन इंजिनिअर यांनी मूल्यांकन पत्र दिलेले आहे. परंतु सदर बांधकामाचा मी शोध घेतला असता ते आढळून आलेले नाही. सदर दिलेल्या तक्रारीचा व झालेल्या चोरीचा आपण सखोल तपास करून दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, असे निवेदनात म्हटले आहे.