भोर : तालुक्यातील भोर २ ग्रामीण फीडरवरील वीसगावमधील गावांत मॉन्सूनपूर्व वादळी पावसाने वीजपुरवठा खंडित झाला होता. त्याला तीन महिने झाले; मात्र कर्मचाऱ्यांना अजूनही वीजपुरवठ्यातील बिघाड (फॉल्ट) सापडत नसल्याने दररोज रात्री वीजपुरवठा खंडित होत आहे. यामुळे नळपाणी पुरवठा योजना, पीठगिरण्या बंद आहेत. तर, मुलांना अभ्यास करता येत नाही. चाऱ्यांचे प्रमाण वाढल्याने रात्रीअपरात्री बाहेर पडण्यास नागरिक घाबरत आहेत. लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. याबाबत वीजवितरण कंपनीकडे वारंवार मागणी करूनही दुर्लक्ष केले जात आहे. यामुळे नागरिक कंपनीच्या कारभाराबद्दल नाराजी व्यक्त करीत आहेत.वीसगावमधील बिघाड काढण्यासाठी विद्युत कंपनीचे कर्मचारी दररोज दुपारी १२ वाजता जातात. विद्युतपुरवठ्यातील बिघाड काढल्यावर ३ ते ४ वाजता वीजपुरवठा सुरळीत होता. मात्र, कर्मचारी घरी गेल्यावर पुन्हा ५ तासांत रात्री ८ ते ९ वाजता पुन्हा वीजपुरवठा खंडित होतो. हे मागील तीन महिन्यांपासून सुरू आहे. यामुळे अनेक गावांच्या नळपाणी पुरवठा योजना बंद असल्याने पिण्याचा पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पीठगिरण्या बंद असल्याने पीठ नाही. सध्या पितृ पंधरवडा सुरू आहे. घरात विविध पदार्थ वाटण्यासाठी मिक्सर, पीठगिरणी चालत नाही. इस्त्री करता येत नाही. विजेअभावी दैनंदिन कामे खोळंबत असल्याने नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. (वार्ताहर)
वीसगाव खोरे तीन महिन्यांपासून अंधारात
By admin | Published: September 23, 2016 2:18 AM