पुणे : वेताळ टेकडीवर फिरायला गेलेला तरुण पाय घसरून खाणीत कोसळला. अग्निशामन दलाच्या जवानांनी त्याला जाळीच्या साहाय्याने बाहेर काढले. ही घटना रविवारी सकाळी पावणेनऊच्या सुमारास घडली.
तनिष्क विशाल लोढा (वय १६) असे या तरुणाचे नाव आहे. तनिष्क हा मित्रांबरोबर वेताळ टेकडीवर सकाळी फिरायला गेला होता. खाणीच्या कडेला उभा असतानाचा त्याचा अचानक पाय घसरला व ताे खाणीत पडला. नागरिकांचा आरडाओरडा ऐकून वेताळ टेकडीवर ड्युटीवर असलेले फायरमन संजय भावेकर हे त्वरित खाणीत उतरले. दरम्यान, त्यांनी एरंडवणा अग्निशमन केंद्राकडे मदत मागितली. भावेकर यांनी त्या तरुणाला पाण्याच्या कडेला आणले. अग्निशमन दलाचे ऑफिसर राजेश जगताप, फायरमन सचिन आयवळे, सचिन वाघोले व इतर घटनास्थळी पोहचले. त्यांनी जाळीच्या साहाय्याने जखमी तरुणाला खाणीतून वर काढले व पुढील उपचारासाठी रुग्णावाहिकेतून रवाना केले.