पुणे - ज्येष्ठ उद्योगपती आणि शिरूरचे माजी नगराध्यक्ष रसिकलाल धारीवाल (वय ७८) यांचे प्रदीर्घ आजाराने मंगळवारी निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी शोभा, मुलगा आणि शिरूरचे माजी नगराध्यक्ष प्रकाश आणि चार मुली असा परिवार आहे.
१ मार्च १९३९ रोजी त्यांचा शिरूर येथे जन्म झाला. धारिवाल कुटुंब दीडशे वर्षांपूर्वी शिरूर येथे स्थायिक झाले. उद्योगव्यवसायात उत्तुंग यश मिळविताना सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि वैद्यकीय संस्थांना सढळ हाताने मदत करणारे दानशूर म्हणून त्यांची ख्याती होती.
माणिकचंद उद्योगसमुहाचे अध्यक्ष म्हणून त्यांची देश- परदेशात ओळख होती. माणिकचंद गुटख्यासोबत त्यांनी अनेक कंपन्या त्यांनी स्थापन केल्या. सुमारे ५० देशांत त्यांच्या व्यवसायाचा विस्तार होता. रसिकलाल यांच्या लहानपणीच त्यांच्या वडीलांचे निधन झाले. आईने मोठ्या हिमतीने त्यांना वाढविले. त्यांच्या वडीलांची शेकडो एकर जमीन होती. मात्र, कमाल जमीन धारणा कायद्यात सर्व जमीन गेली. मात्र, आत्मविश्वासाच्या जोरावर त्यांनी स्वत:चे उद्योग साम्राज्य उभारले. सुरूवातीला स्टेशनरीचे दुकान टाकून त्यांनी व्यवसायाला सुरूवात केली. कोणतेही काम करायचे ते एक नंबर व्हावे, असा त्यांचा सुरूवातीपासूनचा आग्रह असे. त्यामुळे सहा महिन्यांतच शिरूर येथे प्रथम क्रमांकाचे दुकान झाले. त्यानंतर त्यांनी तंबाखुच्या व्यवसायाला सुरूवात केली. ते सायकलवरून सर्वत्र फिरत असत. यातूनच माणिकचंद पानमसाला, गुटखा ही उत्पादने सुरू झाली. ‘उंचे लोग, उंची पसंद’ या घोषवाक्याने त्यांच्या पानमसाल्याने माणिकचंद उद्योगसमुहाचे भविष्यच बदलून गेले. त्यांचा व्यवसाय परदेशातही विस्तारला. त्यानंतर त्यांनी आॅक्सीरिच मिनरल वॉटर, इलेक्ट्रॉनिक अप्लायन्सेससारख्या अनेक उद्योगांची पायाभरणी केली.
धर्म, समाज आणि शिक्षणासाठी अनेक संस्थांना त्यांनी सढळ हाताने मदत केली. वैद्यकीय मदतीसाठी त्यांच्याकडे गेलेला कोणीही विन्मुख होऊन परतत नसे. होतकरू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देऊन आपल्या पायावर उभे करण्यासाठी त्यांनी अनेक उपक्रम राबविले. त्यांनी शिरूर येथे आर. एम. धारिवाल शाळेची स्थापना केली. त्यानंतर अभियांत्रिकी, व्यवस्थापन क्षेत्रातील महाविद्यालये सुरू केली. शिरूरमध्ये मातोधी त्यांनी मदनबाई धारिवाल रुग्णालयाची उभारणी केली. देशातील अनेक रुग्णालयांना त्यांनी मदत केली. पुण्यातील पूना हॉस्पीटलला मदत करून आर.एम. धारिवाल कक्षाची उभारणी केली.
त्यांनी विविध क्षेत्रात आपल्या उद्योजकतेचा ठसा उमटविला होता. १९६२ साली राजकारणात त्यांनी प्रवेश केला. मात्र, केवळ एका मताने त्यांचा पराभव झाला. १९६७ साली त्यांनी नगरसेवकपदासोबतच नगराध्यक्षपदाची निवडणूकही त्यांनी जिंकली. शिरूर शहरावर त्यांचे अखेरपर्यंत राजकीय वर्चस्व होते. शिरूरचे ते २१ वर्षे नगराध्यक्ष होते. सर्वात तरुण नगराध्यक्ष म्हणून त्यांची ओळख होती. त्यांनी शिरूर विधानसभेची निवडणूक १९८० आणि १९८५ अशी दोन वेळा लढविली होती. त्यांनी अनेक संस्था, व्यक्ती यांना मोठ्या प्रमाणात देणग्या दिल्या होत्या. जैन आणि जैनेतर समाजाच्याही अनेक संस्थाना त्यांनी दानशुरपणे मदत केली होती.
>शैक्षणिक, सामाजिक, वैद्यकीय संस्था उभारण्यात मोलाचा वाटारसिकलाल धारिवाल यांचे निधन धक्कादायक आहे. त्यांनी व्यवसाय आणि व्यवहारांत उत्तुंग यश मिळविताना सामाजिक भान कायम ठेवले. शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, वैद्यकीय संस्था उभारण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. जैन आणि जैनेतर समाजालाही त्यांनी सढळ हाताने मदत केली. होतकरू आणि गुणवंत विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेल्या शिष्यवृत्तीमुळे हजारो विद्यार्थ्यांची आयुष्ये उभी राहिली.- विजय दर्डा, अध्यक्ष-अखिल भारतीय सकल जैन समाज