पुणे : ज्येष्ठ कबड्डी संघटक आणि शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते शंकर ढमालेंचे सोमवारी अल्पशा आजाराने निधन झाले. ते ७६ वर्षांचे होते. ते अविवाहित होते. पुणे जिल्ह्यातील कबड्डीचा विकास करताना आदरणीय शरदचंद्र पवार, नाना शितोळे यांच्यासह पुणे जिल्ह्यातील अनेक ज्येष्ठ व्यक्तींच्या खांद्याला खांदा लावून ढमाले यांनी काम केले होते. जिल्ह्यातील कबड्डी वाढवण्यात ढमालेंचा मोठा वाटा होता. कबड्डीतील हाडाचा कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख होती.
पुणे जिल्हा संघटनेत विविध पदांवर त्यांनी काम केले. पुण्यातील कबड्डीत लौकिक असणाऱ्या पूना अॅमेच्युअर्स संघाच्या स्थापनेपासून ते अखेरपर्यंत संघाशी जोडले गेले होते. ढमाले यांचे व्यक्तीमत्व कमालीचे करारी होते. कबड्डी परिवारात त्यांच्याबद्दल प्रत्येकाच्या मनात आदरयुक्त दरारा होता. महाराष्ट्र सरकारने त्यांच्या कार्याची दखल घेत संघटक शिवछत्रपती पुरस्काराने त्यांना गौरवले होते.
कबड्डी महर्षी बुवा साळवी यांच्या कडक शिस्तीत तयार झालेले शेवटचे कबड्डी प्रशासक हरपले. अशा शब्दात उपमुख्यमंत्री व महाराष्ट्र राज्य कबड्डी असो.चे अध्यक्ष अजित पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. तर राज्य कबड्डी असो. चे सरकर्यावाह बाबुराव चांदेरे यांनी ढमाले यांना आदरांजली अर्पण करताना असे म्हंटले की, " कबड्डी या खेळाला शिस्तीच्या चौकटीत बसाविणारा व पुणे जिल्हा संघटनेला एका वेगळ्या उंचीवर नेणारा संघटक सहकारी आम्ही गमावला." आजच वैकुंठ स्मशानभूमी, नवी पेठ, पुणे येथे दुपार नंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.