पुणे : ज्येष्ठ चित्रकार देविदास पेशवे (वय ६०) यांचे मंगळवारी सकाळी खासगी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, दोन कन्या असा परिवार आहे. पेशवे यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
पेशवे हे कर्करोगाने आजारी होते. मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. पेशवे हे मूळचे बारामतीचे. येथील अभिनव महाविद्यालयात ते प्रशिक्षक होते. त्यांनी अनेक पुस्तकांची मुखपृष्ठे साकारली आहेत. दैनिके, साप्ताहिकांतही त्यांनी चित्रे काढली आहेत. वृत्तपत्र पुरवण्यांची सजावट यात त्यांचा हातखंडा होता. चित्रांविषयींचा त्यांचा अभ्यास प्रचंड दांडगा होता. जीव ओतून चित्रे रेखाटणे हा त्यांचा महत्त्वाचा गुण होता. विषय चहुबाजूने समजून घेऊनच ते चित्र रेखाटत असत. शांत स्वभाव आणि कार्यशैलीमुळे ते अनेक प्रकाशन संस्थांशी जोडले गेले होते. उत्तम चित्रकार असण्याबरोबरच ते भाषा, संस्कृती व पुराणाचे अभ्यासक होते. पुण्यातील महत्त्वाच्या प्रकाशन संस्थांच्या पुस्तकांची मुखपृष्ठे पेशवे यांनीच साकारली आहेत.
-------------------------------------------------