पुणे : ज्येष्ठ क्रीडा पत्रकार व कबड्डी संघटक हेमंत जोगदेव यांचे वृद्धापकाळाने गुरुवारी येथे निधन झाले. निधन समयी ते ९६ वर्षांचे होते. त्यांच्या मागे विवाहित कन्या व चिरंजीव असा परिवार आहे. राज्य परिवहन मंडळामध्ये नोकरी करीत असतानाच क्रीडा क्षेत्रासाठी मराठी वृत्तपत्रांमध्ये स्वतंत्र पान सुरू करण्यामध्ये जोगदेव यांचा मोठा वाटा होता. सन १९६५ ते १९९७ या कालावधीमध्ये त्यांनी दैनिक केसरी मध्ये मुख्य क्रीडा प्रतिनिधी म्हणून काम केले.
ऑलिंपिक क्रीडा स्पर्धांसाठी पहिली अधिस्वीकृती (ॲक्रिडेशन) मिळवणारे ते पहिले मराठी क्रीडा पत्रकार होते. म्युनिक, मॉन्ट्रियल, मॉस्को, लॉस एंजेलिस, बार्सिलोना येथे आयोजित करण्यात आलेल्या ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेली आशियाई क्रीडा स्पर्धा, विश्वचषक क्रिकेट स्पर्धा (सन १९८७ व १९९५), विश्वचषक हॉकी स्पर्धा (लाहोर १९९०) इत्यादी स्पर्धांमध्ये दैनिक केसरीचे प्रतिनिधी म्हणून त्यांनी वार्तांकन केले. त्यांनी क्रीडाविषयक दहा पुस्तके लिहिली आहेत. राणा प्रताप कबड्डी संघ, पुणे जिल्हा कबड्डी संघटना, पुणे जिल्हा खो-खो संघटना इत्यादी संस्थांच्या उभारणीमध्येही त्यांचा मोठा वाटा होता.
जोगदेव यांच्यावर आज वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले त्यावेळी क्रीडा क्षेत्रातील बाळासाहेब लांडगे, शकुंतला खटावकर, योगेश गोगावले,किरण भोसेकर, श्रीरंग इनामदार, शरद वाघ, वसंत गोखले, हनुमंत पवार, सागर खळदकर, मोहिनी चाफेकर-जोग, उल्का लेले, सुनील नेवरेकर, प्रा. शैलेश आपटे, अंकुश शेवाळे,नंदू पाटील, प्रा.राघव अष्टेकर, प्रा. मनोज देवळेकर, गिरीश पोटफोडे, पत्रकार क्षेत्रातील अरविंद गोखले, नंदकुमार काकिर्डे आदी अनेक जण उपस्थित होते.