पुणे : ज्येष्ठ तबला वादक मिलिंद पोटे (वय ५६) यांचे प्रदीर्घ आजाराने आज दि. १ मार्च रोजी रात्री निधन झाले. पोटे हे पं. शाम जोशी तसेच तालयोगी पं. सुरेश तळवलकर यांचे पट्टशिष्य होते. अनेक दिग्गज गायक कलाकारांना उदा. भारतरत्न पं. भीमसेन जोशी, विदुषी वीणा सहस्रबुद्धे, पं. उल्हास कशाळकर या आणि अशा अनेक कलाकारांना त्यांनी अतिशय अप्रतिम साथ केली. देश परदेशातही त्यांचे अनेक कार्यक्रम झाले. उत्तम साथ संगतकार म्हणून सर्व कलाकारांमध्ये ते विख्यात होते.
भारती विद्यापीठ पुणे येथे ते गेली अनेक वर्ष विद्यादानाचे कार्य करीत होते. त्यांनी अनेक शिष्य घडवले. वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाले. त्यावेळी संगीत क्षेत्रातले तालयोगी पं. सुरेश तळवलकर, पं. विजय घाटे, पं. रत्नाकर गोखले, श्री. शारंगधर साठे, श्री. प्रमोद मराठे, श्री. गोविंद बेडेकर, पं. हेमंत पेंडसे असे अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी मुलगी भाऊ बहीण मिळवणे असा परिवार आहे.