पुणे : पुण्यातील सार्वजनिक वाहुतुकीचा कणा म्हणून पीएमपीची ओळख आहे. दिवसागणिक लाखो नागरिक पीएमपी बसने प्रवास करतात. त्यातच एकीकडे पेट्रोल आणि डिझेलचे भाव शंभरी पार पोहचल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला चांगलीच झळ पोहचली आहेपण याचदरम्यान सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांना एका विद्यार्थिनीने "तुम्हाला जर बससेवा वेळच्या वेळी मिळाली तर काय करणार" असा प्रश्न विचारला.त्याला उत्तर देताना कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी क्षणाचाही विलंब न करता विद्यार्थिनीलादिलेलं उत्तर चर्चेचा विषय ठरत आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व पीएमपीएमएल यांच्यात नुकताच एक सामंजस्य करार झाला असून या करारानुसार विद्यापीठाचे विद्यार्थी बससेवेविषयक समस्यांबाबत सर्वेक्षण करत आहेत. विद्यापीठातील समाजशास्त्र विभाग व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्त्री अभ्यास केंद्रातील एकूण २० विद्यार्थी विविध वयोगटातील तसेच विविध आर्थिक स्तरातील नागरिकांचे 'पीएमपीएमएल'च्या सुविधांबाबत सर्वेक्षण करत आहेत.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूंना बुधवारी (दि. १८ ) सर्व्हे करणाऱ्या विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारत माहिती घेतली. याच दरम्यान मधुरा गुंजाळ नावाच्या विद्यार्थिनीने कुलगुरूंना "तुम्हाला जर बससेवा वेळच्या वेळी मिळाली तर काय करणार" असा प्रश्न विचारला. त्याला उत्तर देताना कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी क्षणाचाही विलंब न करता म्हणाले ...तर मी माझी कार विकून टाकेन आणि बसने प्रवास करायला सुरुवात करेन. या उत्तराने उपस्थित विद्यार्थ्यांना अनपेक्षित धक्का तर बसलाच. शिवाय शैक्षणिक वर्तुळात या विधानाची जोरदार चर्चा देखील झाली.
पुढे ते म्हणाले, सार्वजनिक वाहतूक आता आहे त्यापेक्षा अधिक सक्षम झाली तर वैयक्तिक वाहने कमी होतील आणि याचा नक्कीच पर्यावरणाला फायदा होईल. या कामासाठी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांचा वाटा आहे ही अत्यंत कौतुकाची बाब आहे असेही करमळकर म्हणाले आहेत.''
पुणे शहरातील तीन हजार तर पिंपरी चिंचवड शहरातील दोन हजार नागरिकांच्या माध्यमातून हे सर्वेक्षण केले जात आहे. यामध्ये सार्वजनिक बसने प्रवास करताना येणाऱ्या अडचणी जाणून घेण्याबरोबरच नवीन सुविधांबाबतही नागरिकांची मते जाणून घेण्यात येत आहेत. हे सर्वेक्षण समाजशास्त्र विभागप्रमुख डॉ. श्रुती तांबे आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ स्त्री अभ्यास केंद्र संचालक डॉ.अनघा तांबे यांच्या पुढाकाराने होत आहे.