पुणे : दक्षिण महाराष्ट्रातील ख्यातनाम आंतरभारती शिक्षण मंडळाची २०२१ ते २०२४ दरम्यानची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून, पुणे येथील ज्येष्ठ पत्रकार व जडण-घडण मासिकाचे मुख्य संपादक डॉ. सागर देशपांडे यांची उपाध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली आहे.
फाय फाऊंडेशन पुरस्कारप्राप्त शिक्षणतज्ज्ञ अनंतराव आजगावकर हे या संस्थेचे संस्थापक-मानद सचिव, विजय देसाई हे अध्यक्ष तर प्रा. नीळकंठ ठाकुर हे सचिव म्हणून काम पाहणार आहेत.
साने गुरुजींच्या प्रेरणेतून स्थापन झालेल्या आंतरभारती शिक्षण मंडळ या संस्थेचे यंदा हीरकमहोत्सवी वर्ष आहे. मंडळाच्या कोल्हापूरसह ग्रामीण भागात आठ शाखा असून, जागतिक ख्यातीचे शिक्षणतज्ज्ञ पद्मभूषण डॉ. जे. पी. नाईक यांच्या नावे वरिष्ठ महाविद्यालयदेखील चालवण्यात येते. या संस्थेचे माजी विद्यार्थी आणि संचालक असलेल्या डॉ. देशपांडे यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कारासह साहित्य आणि पत्रकारितेमधील वीसपेक्षा अधिक पुरस्कारप्राप्त डॉ. देशपांडे हे लेखक आणि नामवंत वक्ता म्हणूनही परिचित आहेत. भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयांतर्गत राष्ट्रीय निवड समितीवर तसेच महाराष्ट्र शासनाच्या नवीन शैक्षणिक धोरणविषयक समितीवरही ते निमंत्रित आहेत.