पुणे : हजारो गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी सध्या येरवडा तुरुंगात असणारे डीएसके ऊर्फ दीपक सखाराम कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नीवर एका पीडित महिलेने दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला आहे. या महिलेने डीएसकेंच्या कंपनीत ४० लाख रुपयांची गुंतवणूक केली होती. त्यावरील व्याज मिळावे, यासाठी तिने दिवाणी न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायाधीश आर. एच. नाथानी यांच्या न्यायालयात हा दावा दाखल करण्यात आला आहे. डीएसके समूहाचे संचालक दीपक सखाराम कुलकर्णी (वय ७०) आणि त्यांच्या पत्नी हेमंती दीपक कुलकर्णी (वय ६५) यांच्या विरोधात ४० लाख रुपये व त्यावरील व्याज मिळावे, या कारणासाठी पुण्यातील पीडित महिलेने तक्रार दिली आहे. दावा दाखल करणारी महिला घटस्फोटित असून तिच्या मुलीसह शहरात राहते. घटस्फोट मिळवताना मुंबई कौटुंबिक न्यायालयात २०११ मध्ये घटस्फोटाची तडजोड झाली. मुंबई कौटुंबिक न्यायालयात तिच्या पतीने पीडित महिलेला कायमस्वरूपाची एकरकमी पोटगी व तडजोडीची तसेच एकरकमी पोटगी म्हणून ४० लाख रुपये दिले होते. मुलीच्या शिक्षणासाठी व भविष्यात लग्नाच्या खर्चासाठी जास्त पैसे मिळतील व डीएसके समूहाच्या चांगल्या परताव्याच्या आमिषाने पीडित महिलेने मोठ्या विश्वासाने २०१२मध्ये तिने हे पैसे डीएसके ग्रुपमध्ये गुंतविले होते. डी. एस. कुलकर्णी व त्यांचे कुटुंबीय सध्या पुणे येथील येरवडा कारागृहात असून त्यांच्यावर राज्यात अनेक ठिकाणी फौजदारी गुन्हे दाखल झाले आहेत. न्यायालयाच्या आदेशानुसार डीएसके समूहाच्या काही स्थावर, जंगम मिळकतींचा लिलाव होऊन ठेवीदारांना/गुंतवणूकदारांना पैसे मिळतील, अशी आशा आहे. पैशाची मागणी कायदेशीररीतीने राहावी, यासाठी पीडित महिलेने अॅड. मिलिंद पवार, अॅड. योगेश पवार व अॅड. अजय ताकवणे यांच्या वतीने पुणे येथील दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर यांच्या न्यायालयात दिवाणी स्वरूपाचा दावा दाखल केला आहे. या प्रकरणी आर्थिक गुन्हे अन्वेषण पुणे पोलिसांनी त्या पीडितेचा जबाबही नुकताच नोंदविल्याचे पवार यांनी सांगितले.
पीडित महिलेची डीएसकेंविरोधात दिवाणी न्यायालयात धाव
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2020 4:47 PM
डीएसकेंच्या कंपनीत केली होती ४० लाख रुपयांची गुंतवणूक
ठळक मुद्दे४० लाख रुपये व त्यावरीझोप ल व्याज मिळावे, या कारणासाठी पुण्यातील पीडित महिलेने दिली तक्रार ऱ्या