वडगाव मावळ : थुगावच्या हद्दीत थुगाव-कामशेत खड्डेमय रस्त्यातील खड्डा चुकविताना गुरुवारी सायंकाळी सहाच्या सुमारास दुचाकी घसरून झालेल्या अपघातात दुचाकीमागे बसलेली महिला गंभीर झाली होती. या महिलेचा शनिवारी सकाळी आठच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाला. जून महिन्याच्या पहिल्याच पावसाने झालेल्या खड्डेमय रस्त्याने महिलेचा बळी घेतला असून, रस्त्याची त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीचालक सचिन महादू सावंत (वय २१) व त्यांची आई हौसाबाई महादू सावंत (वय ५०, दोघे रा. थुगाव, ता. मावळ) दुचाकीवरून गुरुवारी सायंकाळी बुधवडी येथे त्यांच्या नातेवाइकांना भेटण्यासाठी थुगाव-कामशेत रस्त्यावरून जात होते. त्या वेळी रस्त्यातील खड्डा चुकवताना दुचाकी घसरून अपघात झाला. अपघातात हौसाबाई यांच्या डोक्याला गंभीर जखम झाली होती. त्यांना सोमाटणे येथील खासगी रुग्णालयात वैद्यकीय उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांचा शनिवारी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. हवालदार शिवळी तपास करीत आहेत. जून महिन्याच्या पहिल्याच पावसाळ्यात थुगाव-कामशेत रस्त्याची मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून, या रस्त्यावरील खड्डे चुकवताना कसरत करावी लागत होती. आणखी किती बळींची प्रतीक्षा करणार असल्याचे ग्रामस्थांनी प्रश्न उपस्थित केला. थुगाव-कामशेत रस्त्याची त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली.(वार्ताहर)
खड्ड्याने घेतला महिलेचा बळी
By admin | Published: June 29, 2015 6:36 AM