पुणे : महापालिका, अन्न व औषध प्रशासन, अग्निशामक दल आणि पोलीस यंत्रणांच्या असंवेदनशील वृत्तीमुळेच कोंढव्यातील सहा कामगारांना आगीमध्ये आपले प्राण गमवावे लागले आहेत. आगीमध्ये होरपळलेले ते सहा मृतदेह पाहताना अग्निशामक दलाच्या जवानांनाही गहिवरून आले होते. मानवी जीविताबाबतची ही उदासीनवृत्ती संपणार कधी हा प्रश्न आहे. कोंढव्यातील तालाब कंपनीजवळ असलेल्या गगन अॅव्हेन्यू टॉवर्स या इमारतीमधील तळमजल्यावर असलेल्या क्रमांक सातच्या गाळ्यामध्ये ‘बेक्स अॅन्ड केक्स’ ही बेकरी आहे. साधारणपणे २०० स्क्वेअर फुटांची ही बेकरी आहे. या बेकरीमध्ये शुक्रवारी पहाटे पावणेपाचच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे आग लागून सहा कामगारांचा मृत्यू झाला. या बेकरीचे तीन भाग करण्यात आलेले आहेत. एका भागामध्ये विक्री काऊंटर आहे. तर मागील भागामध्ये स्वयंपाकासाठी जागा ठेवण्यात आलेली आहे. या ठिकाणी बेकरी पदार्थ तयार केले जातात, तर पोटमाळ्यावर पीठ मळण्यासाठी मोटार बसवण्यात आलेली आहे. तसेच तेथेच मोठा ओव्हनही ठेवण्यात आलेला आहे. साधारणपणे चार फुटांच्या उंचीच्या पोटमाळ्यावरच अडचणीमध्ये सर्व कामगार झोपत होते. तय्यब मूळचा उत्तर प्रदेशातील बिजनौरचा रहिवासी आहे. आगीमध्ये होरपळून मृत्युमुखी पडलेले सर्व कामगारही बिजनौरचेच रहिवासी होते. घरची गरिबी त्यांना काबाडकष्ट करून घेण्यासाठी पुण्यामध्ये घेऊन आली. सहा जण अत्यंत चिंचोळ्या आणि छोट्याशा जागेमध्ये बेकरीतच राहत होते. स्वत:च्या हाताने स्वयंपाक करून त्यांचा उदरनिर्वाह चालत होता. गुरुवारी रात्री सर्व काम संपवल्यानंतर त्यांचे मालक बेकरीचे शटर बंद करून घरी निघून गेले. रात्री अचानक शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. खालच्या जागेमध्ये आग लागलेली असल्यामुळे संपूर्ण बेकरीमध्ये धूर कोंडला होता. पोटमाळ्यावर झोपलेल्या कामगारांना खाली उतरताच आले नाही. श्वास गुदमरू लागल्यामुळे एकमेकांना घट्ट बिलगलेले हे सहा जण मृत्युमुखी पडले. त्यांचे मृतदेह त्याच अवस्थेत आढळून आले. दुकानामध्ये पाच कर्मचारी ठेवण्याची परवानगी असतानाही तेथे जास्त कर्मचारी ठेवण्यात आले होते. बेकायदा पोटमाळा बांधल्यानंतरही महापालिकेकडून कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. तसेच अग्निशामक दलाकडून ना-हरकतपत्रही घेण्यात आलेले नव्हते. ...तर कदाचित प्राण वाचले असतेही बेकरी सैफुद्दीन झामुवाला यांच्या मालकीची असून अब्दुल मोहम्मद युसूफ चिन्नीवार (वय २७, रा. कुमार होम्स, एनआयबीएम रस्ता कोंढवा), मोहंमद तय्यब शहीद अन्सारी (वय २४, रा. हडपसर) व मोहंमद मुनीर चिन्नीवार (वय ५९, रा. पारगेनगर, कोंढवा) या तिघांनी भागीदारीमध्ये दरमहा ३८ हजार रुपये भाड्याने घतेली आहे. मोहंमद तय्यब अन्सारी व मुनीर चिन्नीवार हे दोघे बेकरीत भागीदार आहेत. मुनीर व अब्दुल हे काका-पुतण्या आहेत. अब्दुल व तय्यब दोघे दुकानाचे काम पाहतात. २०१४ मध्ये ही बेकरी सुरू करण्यात आलेली आहे.जेव्हा अग्निशामक दलाचे जवान शटर उघडून आतमध्ये गेले तेव्हा भीषण चित्र त्यांना पाहायला मिळाले. मृतदेहांची अवस्थाच त्यांना झालेला त्रास विशद करीत होती. अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांसह जवानांचेही डोळे ही अवस्था पाहून पाणावले होते. मालकाने जर बाहेरून कुलूप लावले नसते तर कदाचित त्यांचे प्राण वाचले असते.
प्रशासकीय उदासीनतेने घेतले बळी
By admin | Published: December 31, 2016 5:48 AM