मराठा आरक्षण व कोरोनामुळे एमपीएससीतर्फे घेतल्या जाणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षा सुमारे दोन वर्षांपासून पुढे ढकलल्या जात आहेत. मात्र, ग्रामीण भागातून येऊन प्रसंगी एक वेळ उपाशी राहून स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनस्थितीवर परिणाम झाला आहे. परीक्षा नियोजित वेळेत होत नसल्याने विद्यार्थी नैराश्यात गेले आहेत. पुण्यात स्वप्निल लोणकर यांनीसुद्धा नैराश्यात येऊन आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले. उच्च शिक्षण घेऊन क्षमता असूनसुद्धा नोकरी मिळत नसल्यामुळे स्वप्निलप्रमाणे अनेक विद्यार्थी सध्या नैराश्यात गेले आहेत.
एमपीएससीच्या पूर्व आणि मुख्य परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतरही २ वर्षे मुलाखत झालीच नाही आणि स्वप्निल हळूहळू नैराश्यात गेला. या काळात घरची परिस्थिती आणि परीक्षेनंतर नोकरी लागेल, या आशेवर घेतलेले कर्ज यासारख्या कारणांमुळेही स्वप्निलवरील तणाव वाढत गेला. त्याच्या संयमाचा अंत झाला आणि त्याने हे टोकाचे पाऊल उचलले.
-----
स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे बहुतांश तरुण उच्च शिक्षित असूनदेखील नोकरी नसल्याने निराश आहेत. पुण्यातील फुरसुंगीतील स्वप्निल लोणकर या विद्यार्थ्याने स्वतःच्या आयुष्याचा प्रवास संपवला. त्याच्या आत्महत्येस पूर्णतः महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि महाविकास आघाडी सरकार जबाबदार आहे. राज्य सरकारने तातडीने याबाबत उपाययोजना न केल्यास शासनाला घाम फोडणारे आंदोलन केले जाईल.
- कल्पेश यादव, शहराध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना, पुणे शहर
--------------------
काही महिन्यांपूर्वीच एमपीएससीच्या विषयाला घेऊन पुण्यासह संपूर्ण राज्यात आंदोलन झाले. परंतु, या आंदोलनानंतरदेखील राज्य शासन स्पर्धा परीक्षा देणाऱ्या उमेदवारांबाबत गंभीर नाही. हे या घटनेवरून लक्षात येते. राज्य शासनाच्या नाकर्तेपणाने उच्च शिक्षित स्वप्निल लोणकरचा बळी घेतला आहे. स्वप्निल लोणकरसारखी वेळ अन्य उमेदवारांवर येऊ नये यासाठी शासनाने त्वरित अन्य उमेदवारांच्या मुलाखती घेऊन त्यांना नोकरीवर रुजू करावे
- सिद्धेश्वर लटपटे, महाराष्ट्र प्रदेश मंत्री, अभाविप
-------------
स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याने केलेली आत्महत्या ही दुर्दैवी घटना घडली असून वेळेवर परीक्षा न घेतल्याने विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड नैराश्याचे वातावरण आहे. त्यामुळे अशा घटना पुन्हा होऊ नये, यासाठी एमपीएससीने यूपीएससीप्रमाणे नियोजन करून परीक्षा घ्याव्यात.
- संध्या सोनवणे, विद्यार्थिनी, स्पर्धा परीक्षा
----------------
२०१९ मध्ये जाहीरात आलेली गट ब ची परीक्षा ५-६ वेळेस पुढे ढकलण्यात आली. दिवसेंदिवस वाढत चाललेले वय आणि कर्जाचा डोंगर यामुळे विद्यार्थी मेटाकुटीला आले आहेत. अधिकारी बनण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या मुलींना आयोगाच्या कारभारामुळे आणि आर्थिक अडचणीमुळे आपल्या स्वप्नांचा त्याग करावा लागत आहे. संयुक्त पूर्व परीक्षांची तारीख, रखडलेल्या सर्व परीक्षांचे आणि नवीन जाहिरातीचे वेळापत्रक लवकरच जाहीर करावे.
- राम लेंडेवाड, विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा
-----------------
एमपीएससीच्या परीक्षा वेळेवर होत नाही. तसेच एमपीएससीची पाच सदस्य एक अध्यक्ष अधिक अशी रचना असताना गेली तीन वर्षे फक्त एक अध्यक्ष व एक सदस्य मिळून कारभार पाहत आहे. त्यामुळे ना निकाल वेळेवर लागतो ना परीक्षा वेळेवर होतात. म्हणून हा सरकारी अनास्थेचा बळी आहे. सरकारने आतातरी वेळेवर परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांना न्याय द्यावा.
- नीलेश निंबाळकर, विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा
-------------
स्वप्निलने केलेली आत्महत्या नसून एक प्रकारे व्यवस्थेकडून झालेला खूनच आहे. असे सत्र गेल्या तीन वर्षांपासून सतत चालूच आहे. राज्यकर्त्यांच्या चुकीच्या धोरणामुळे हे प्रकार घडत आहेत. कोणतेही शासन असो - आधीचे किंवा आत्ताचे असो. राज्याच्या युवा नेतृत्वाने पक्ष, संघटना या सर्वांपलीकडे जाऊन या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे. अन्यथा असे अनेक स्वप्निल आत्महत्येच्या उंबरठ्यावर आहेत. हे त्यांनी लक्षात घ्यावे.
-कुलदीप आंबेकर, अध्यक्ष, स्टुडंट हेल्पिंग हँड
----- -----
स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना एकूण परिस्थितीची जाणीव करून देणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे शासनाने आपल्या धोरणात आवश्यक बदल करून स्पर्धा परीक्षा नियोजित वेळेत घ्याव्यात. तसेच प्रलंबित नियुक्त्या तत्काळ मार्गी लावाव्यात.
- अक्षय जैन, सचिव, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस
--- ------
पूर्वीच्या व सध्याच्या शासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. शासनाने त्यात दुरुस्ती करून परीक्षा व नियुक्तीबाबत सकारात्मक धोरण घेऊन त्याला गतिमानता द्यावी अन्यथा विद्यार्थ्यांमध्ये नैराश्य वाढत जाईल.
- महेश बढे, एमपीएससी स्टुडंट राईट्स