लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : पिंपळे सौदागर येथे बांधकाम साइटवरून पडून दोन दिवसांपूर्वीच दोन मजुरांचा मृत्यू झाला. ही घटना ताजी असतानाच गणेशनगर, बोपखेल येथील बांधकाम साइटवरून पडून जखमी झालेल्या बाबूल चव्हाण (वय ४०, धानोरी) या मजुराचा बुधवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. संरक्षण साहित्याशिवाय जीव धोक्यात घाऊन बांधकामाच्या साइटवर काम करणा-या मजुरांचा कोणीही वाली नसल्याचे दिसून येत आहे. बोपखेल येथील गणेशनगरच्या बांधकाम साइटवर काम करताना उंचावरून पडून चव्हाण जखमी झाले होते. १४ दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. २४ मे रोजी उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. बांधकाम मजुरांना सुरक्षा साधने पुरविली नाहीत. मजुरांच्या सुरक्षिततेची दक्षता घेण्यात हलगर्जीपणा दाखवला म्हणून मिडीयन पांडुरंग साठे (वय ४५, विश्रांतवाडी), अक्षय अरुण म्हस्के (वय २५) या दोन ठेकेदारांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मजुराच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. दिघी पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक बी एस मोघे यांनी आरोपींविरोधात फिर्याद दाखल केली आहे.रविवार आणि सोमवार अशा दोन दिवसांत दुर्घटना घडल्या आहेत. मजुरांच्या सुरक्षिततेबाबत योग्य ती दक्षता न घेतल्याने अशा प्रकारे मजुरांना जीव गमाविण्याची वेळ येत आहे. मजुरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पिंपळे सौदागर येथील एका बांधकाम साइटवर काम करणाऱ्या संतोष दरगोराय यादव (वय ३८ रा. पिंपळे सौदागर) या मजुराचा मृत्यू झाला. यादव हा आठव्या मजल्यावर छताचे बांधकाम करीत होता. सायंकाळी डक्टमध्ये पडून तो गंभीर जखमी झाला. त्याचा जागीच मृत्यू झाला.
बांधकाम साइटवर जातोय मजुरांचा बळी
By admin | Published: May 26, 2017 6:13 AM