पुणे : १९७१ च्या युद्धात भारतीय सैनिकांनी अतुलनीय साहस, शाैर्य आणि पराक्रम गाजवत शत्रुला नामोहरम केले. यामुळे बांग्लादेश स्वतंत्र झाला. या निर्णायक लढाईत पाकिस्तानच्या ९३ हजार सैनिकांनी आत्मसमर्पण केले. याची नोंद जगाच्या इतिहासात नोंदवली गेली, असे प्रतिपादन दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल जे. एस. नैन यांनी केले.
१९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धातील गौरवशाली विजय आणि बांग्लादेशाच्या निर्मितीला या वर्षी ५० वर्ष पुर्ण झाले. हे वर्ष स्वर्णिम विजय वर्ष म्हणून साजरे करण्यात येत आहे. या निमित्त विययी मशाल दक्षिण मुख्यालयाच्या क्षेत्रातून काढण्यात आली. या मशालीचे आमगन शुक्रवारी पुण्यात झाले. कात्रज येथे या मशालीचे भव्य स्वागत करण्यात आले. त्यानंतर दुचाकी रॅली आणि १९७१ च्या युद्धात सहभागी झालेल्या निवृत्त जवानांनी ही मशाल राष्ट्रीय युद्ध स्मारक येथे आणत शहिद जवानांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी लेफ्टनंट जनरल जे. एस. नैन यांनी मशालीचे स्वागत केले. विजय मशालीच्या स्वागतासाठी युद्ध स्मारक येथे भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी सैनिक उपस्थित होते. या कार्यक्रमाला बांगलादेशचे उप उच्चायुक्त लुत्फोर रहमान उपस्थित होते.
३१ ऑक्टोबरला या मशालीचे नाशिकला प्रस्थान होणार
वीर नारी, जेष्ठ माजी सैनिक आणि १९७१ च्या युद्धातील दिग्गजांनीही या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. आर्मी कमांडर यांनी या दिग्गजांचा आणि वीर नारींचा सत्कार केला. त्यांच्याबद्दल दृढ ऐक्य आणि कृतज्ञता व्यक्त केली. पुण्यातील विजय मशालीच्या मुक्कामाच्या नियोजित महिन्याभराच्या उत्सवात, विजय मशाल आयएनएस शिवाजी लोणावळा, पुणे विद्यापीठ, शनिवार वाडा, फर्ग्युसन महाविद्यालय, शिवाजी नगर, पोलीस परेड ग्राउंड इत्यादी महत्वाच्या ठिकाणी नेण्यात येणार आहे. ३१ ऑक्टोबरला या मशालीचे नाशिकला प्रस्थान होणार आहे.