पुणे : सनी इलेव्हन टी-२० क्रिकेट स्पर्धेत धीरज फटांगरेच्या शानदार फलंदाजीच्या जोरावर डेक्कन जिमखाना संघाने साॅफ्टहार्ड संघावर ५८ धावांनी विजय मिळवला. तर राॅक अकादमीने रायझिंग क्रिकेट क्लबवर विजय साकारला. डेक्कन जिमखाना संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत पाच बाद १७८ धावा केल्या. साॅफ्टहार्ड पुणे संघाला २० षटकांत ९ बाद १२० धावाच करता आल्या. डेक्कन जिमखाना संघाकडून धीरज फटांगरेने ४८ चेंडूंत सात चौकार आणि पाच षटकारांसह नाबाद ८७ धावा केल्या. स्वप्निल गुगळे (३८), शुभम नागवडे (१३) यांनीही त्याला साथ दिली. साॅफ्टहार्ड संघाकडून शुभम हरपाले याने दोन तर यतीन मांगवानी, सईद ईझान आणि खाटपे यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. साॅफ्टहार्ड पुणे संघाकडून पारस रत्नपारखे याने एकाकी झुंज देताना ५७ चेंडूंत १० चौकारांसह ७१ धावा केल्या. डेक्कनकडून स्वप्निल गुगळेने ३, पीयूष साळवीने, रोहन फंड यांनी प्रत्येकी दोन तर ईशान कुलकर्णी, प्रज्ज्वल मुंगरे यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. धीरज फटांगरे सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.
दुस-या लढतीत राॅक अकादमीने रायझिंग क्रिकेट क्लबवर पाच गडी राखून विजय मिळवला. रायझिंग क्लबने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत सर्वबाद १३० धावा केल्या. राॅक अकादमीने १५.४ षटकांत पाच बाद १३१ धावा करत विजय मिळवला. योगेश चव्हाणने ३० चेंडूत चार चौकार व दोन षटकारांसह नाबाद ४३ धावा केल्या. रायझिंग क्लबकडून शराफत अली (२४) याने सर्वाधिक धावा केल्या. तर योगेश चव्हाण, शाश्वत देशमुख आणि प्रशांत टिळेकर यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. राॅक अकादमीकडून चव्हाण आणि शाश्वत लवाटे (नाबाद २४) यांनी सर्वाधिक धावा केल्या. योगेश चव्हाणला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
फोटो आहेत -