मंचर:आंबेगाव तालुक्यातील सर्वांत मोठी ग्रामपंचायत असलेल्या मंचर शहरात महाविकास आघाडीने १७ पैकी १६ जागा जिंकल्या आहेत. तर, एका जागी अपक्ष विजयी झाला आहे. महाविकास आघाडी विरुद्ध भाजप विरुद्ध काँग्रेस अशा झालेल्या लढतीत महा विकासआघाडी सरस ठरली आहे.
मंचर ग्रामपंचायतीमध्ये एकूण १७ जागा असून त्यापैकी नऊ जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. आठ जागांसाठी २१ उमेदवार निवडणूक रिंगणात उभे होते वाॅर्ड क्रमांक २ व वार्ड क्रमांक ६ मध्ये झालेल्या अतीतटीच्या लढतीत महाविकास आघाडीने बाजी मारण्यात यश मिळवले आहे. मंचर येथे झालेल्या महाविकास आघाडी मध्ये शिवसेना, राष्ट्रवादी व लोकनेते माजी खासदार किसनराव बाणखेले गट एकत्र आले होते. त्यांच्याविरुद्ध भाजप व काँग्रेस आय यांनी आपली पूर्णपणे ताकद लावली होती. मात्र, जनतेने दिलेल्या कौलामध्ये महाविकास आघाडीने बाजी मारली असल्याचे चित्र दिसत आहे. आज झालेल्या निकालानुसार वाॅर्ड क्रमांक एक मध्ये ज्योती भाऊ निघोट, विशाल विलास मोरडे, दीपाली रामदास थोरात (सर्व बिनविरोध) वाॅर्ड क्रमांक २ मध्ये सुप्रिया शिवप्रसाद राजगुरू, युवराज प्रल्हाद बाणखेले, वंदना कैलास बाणखेले. वाॅर्ड क्रमांक 3 मध्ये सविता दिनकर शिरसागर (बिनविरोध) श्याम शांताराम थोरात (अपक्ष). वाॅर्ड क्रमांक ४ मध्ये रंजना शिवाजी आतार, किरण देविदास राजगुरू, सतीश अरुण बाणखेले(सर्व बिनविरोध) वार्ड क्रमांक ५ मध्ये ज्योती प्रकाश थोरात, ज्योती संदीप बाणखेले (दोन्ही बिनविरोध), पल्लवी संदीप थोरात. वाॅर्ड क्रमांक ६ मध्ये कैलास राजाराम गांजाळे, अरुण बाबूराव बाणखेले, माणिक संतोष गावडे हे विजयी झाले.
मंचर याठिकाणी मागील अनेक वर्षापासून शिवसेनेचे प्राबल्य समजले जाते. मात्र, काही अवघ्या महिन्यांवर याठिकाणी नगरपंचायत होणार असल्याने ही निवडणूक मंचरचे माजी सरपंच दत्ता गांजाळे, शरद बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे. यांनी बिनविरोध करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी व काँग्रेस आय यांनी आपले उमेदवार उभे केल्यामुळे बिनविरोध होऊ शकली नाही. विजया नंतर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.
१८ मंचर