पुणे : शहर लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसमध्ये आता २ नावांमध्येच स्पर्धा सुरू आहे. कसब्यात काँग्रेसला विजय मिळवून देणारे आमदार रवींद्र धंगेकर यांना पुन्हा मैदानात उतरवायचे की? दोन लोकसभा लढवण्याचा अनुभव असलेल्या जोशी यांना अनुभव नसलेल्या प्रतिस्पर्धी उमेदवारासमोर उभे करायचे? यावर काॅंग्रेसमध्ये मंथन सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. लोकप्रियतेच्या वाटेवर जायचे की अनुभवाचा हात धरून त्याचा फायदा घ्यायचा? या विचारात काँग्रेसश्रेष्ठी पडले असल्याचे समजते.
धंगेकर यांची लोकप्रियता मोठी आहे. तेच लोकसभेचे काँग्रेसचे उमेदवार असतील, अशी चर्चा सुरू झाली आहे. आमदार झाल्यानंतर त्यांनी जाणीवपूर्वक कधीही कोणत्याही वेळेस धावून येणारा कार्यकर्ता अशी प्रतिमा निर्माण केली आहे. मात्र एका विधानसभा मतदारसंघात ठीक आहे, ६ विधानसभा मतदारसंघांसाठी ते योग्य उमेदवार ठरतील का? ते पक्षाचे जुने सदस्य नाहीत, त्यामुळे पक्षाचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते झोकून देऊन काम करतील का? असेही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्या तुलनेत जोशी पक्षाचे मागील ४० वर्षांपासूनचे पदाधिकारी आहेत, दोन वेळा लोकसभा निवडणूक लढवल्याने त्यांना मतदारसंघाचा कानाकोपरा माहिती आहे, कर्नाटक, तेलंगणा या राज्यातील विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता, त्याशिवाय कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीचे नियोजनही त्यांनीच केले होते. भाजपने उमेदवार जाहीर करण्यात आघाडी घेतली आहेच, शिवाय प्रचाराला सुरुवात करून त्यातही बाजी मारली आहे. तरीही काँग्रेसचे शहरापासून दिल्लीपर्यंत व्हाया प्रदेश काँग्रेस सर्व शांत आहेत.
याबाबत प्रदेश स्तरावर काम करणाऱ्या एका नेत्याने सांगितले की, ही काँग्रेसची पद्धतच आहे. शांतता वाटत असते, मात्र काम सुरूच असते. पुणे शहर लोकसभा मतदारसंघासाठी आता २ च नावे शिल्लक राहिली असून त्यांच्यातच डावे-उजवे करून अंतिम निर्णय घेतला जाईल, अशी माहिती याच नेत्याने दिली.
काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची (सीईसी) बैठक मंगळवारी (दि. १९) दिल्लीत होत आहे. मात्र या बैठकीत प्रथम विदर्भातील जागांवरील उमेदवारांच्या नावाबाबत चर्चा होणार आहे. विदर्भात रामटेक, नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा-गोंदिया असे ५ लोकसभा लोकसभा मतदारसंघ आहेत. महाविकास आघाडीत या सर्वच जागा काँग्रेस लढवत आहे. या मतदारसंघात पहिल्याच टप्प्यात (दि. १६ एप्रिल) मतदान आहे. त्यामुळे दिल्लीतील बैठकीत याच जागांवरील उमेदवार निवडीला प्राधान्य दिले जाईल. त्यामुळे मंगळवारीही पुण्यातील उमेदवाराचे नाव जाहीर होणे अवघड आहे, असे काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.