पुणे : सत्ता कोणाचीही असो देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्य कायम राहिले पाहिजे. ‘दक्षिणायन’ ने त्यावेळी केलेल्या ‘अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच होता कामा नये, तो होतो आहे असे वाटत असेल तर विरोध करा’ हे आवाहन अजूनही कायमच आहे असे दक्षिणायन संस्थेचे प्रमुख, प्रसिद्ध भाषा अभ्यासक डॉ. गणेश देवी यांनी सांगितले.लोकसभा निवडणूकीच्या आधी देशभरातील काही प्रसिद्ध कलावंत, लेखक यांनी डॉ. देवी यांच्या पुढाकाराने स्थापन करण्यात आलेल्या दक्षिणायन संस्थेच्या वतीने एक आवाहन करण्यात आले होते. त्यात त्यांनी सध्याच्या काळात अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच होत आहे, डॉ. नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, गौरी लंकेश, एम. एम. कलबुर्गी अशा विचारवंतांच्या हत्या होत आहेत, त्यामुळे आताच्या सत्तेला विरोध करावा अशा आशयाचे आवाहन केले होते. त्यावरून बराच गदारोळ झाला व प्रत्युत्तर म्हणून देशातील अन्य काही कलावंत लेखक यांनी सध्याच्या सत्ताधाऱ्यांना मतदान करा असेही आवाहन केले होते.दक्षिणायन संस्थेच्या आवाहनाला लोकांकडून कमी प्रतिसाद मिळाला असे डॉ. देवी यांना विचारले असता ते म्हणाले, ‘‘आमचे आवाहन अजूनही कायम आहे. कारण झालेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवरच ते केले होते व परिस्थितीत अजूनही काही फरक पडला असे वाटत नाही. लोकांकडून कमी प्रतिसाद मिळाला हे खरे असले तरीही त्याची कारणे वेगळी आहे. समाजमाध्यमांनी तयार केलेली पंतप्रधान नरेंद्री मोदी यांची प्रतिमा, देशातील बहुसंख्य इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे सत्ताधाऱ्यांबरोबर झालेले साटेलोटे व फक्त भारतातच नाही तर जगातील अनेक देशांमध्ये आलेली ‘एक्स्ट्रिीम राईट’ची लाट (उजव्या विचारसरणीचे कट्टरतावादी) यामुळे भारतीय मतदार प्रभावी होऊन हे झाले असावे. देशामध्ये पुलवामा व बालाकोट यानंतर देशात देशभक्तीची लाट उसळवली गेली. मात्र असे असले तरी दक्षिणायन चे आवाहन अजूनही कायम आहे. लोकांना सातत्याने सांगत रहावे लागते व देशातील विचारवंतांचे ते कामच आहे असे डॉ. देवी म्हणाले.प्रसिद्ध लेखक गणेश विसपुते हेही या आवाहनात सहभागी होते. ते म्हणाले, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची लढाई ही दिर्घ पल्ल्याची लढाई असते. आता निकाल असा लागला असला तरी म्हणून त्याचा अर्थ आम्ही चुकीचे होतो असा होत नाही. सामाजिक, सांस्कृतिक भूमी तयार करणे हे वेळ घेणारे काम असते. त्यात सध्या माहितीचा इतका मारा होत असतो की त्यात समाजमन गोंधळून जाते. तसे होईल अशी स्थिती देशात नक्कीच निर्माण झाली होती. दोन अधिक दोन चार असे पक्के उत्तर या लढाईत येत नाही. इतका मोठा विजय झाला तर जनतेने रस्त्यावर येऊन जल्लोष का केला नाही. याआधी जनता पार्टी व त्यानंतर इंदिरा गांधी यांचा विजय झाला त्यावेळी तो जनतेने साजरा केला. यावेळी तसे दिसले नाही. त्यामुळे आवाहनाला प्रतिसाद मिळाला नाही किंवा कमी मिळाला असे म्हणजे योग्य की अयोग्य यात जाण्यात अर्थ नाही. आमचे म्हणणे आम्ही मांडतच राहणार आहोत.मुंबईस्थित आनंद पटवर्धन म्हणाले, मीही त्या आवाहनात होतो. घटनाच तशा घडत होत्या. विचारवंतांच्या हत्या होत होत्या, नाट्यप्रयोगांना, चित्रपटांना बंदी घालण्याची भाषा होत होती. अशा वेळी असे आवाहन करावेच लागते. लेखक मेला आहे असे लेखकाला म्हणावे लागते याला वातावरण चांगले आहे असे कसे म्हणता येईल. अशा वेळी एक कलावंतांची जी जबाबदारी असते ती पार पाडणे महत्वाचे असते. निवडणूक निकाल असे लागले याचा अर्थ कोणी आमचे ऐकले नाही असा काढता येणार नाही किंवा आम्ही आमचे म्हणणे मांडणे बंद करू असाही नाही. आमचे काम आम्ही केले. ते करतच राहणार आहोत. .......
प्रज्ञासिंहचा विजय चिंताजनक : ‘ दक्षिणायन’ चे आवाहन अजूनही कायमच : डॉ. गणेश देवी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2019 1:04 PM
सत्ता कोणाचीही असो देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्य कायम राहिले पाहिजे..
ठळक मुद्देअभिव्यक्तीचा संकोच होता कामा नयेसामाजिक, सांस्कृतिक भूमी तयार करणे हे वेळ घेणारे काम