पुणे : आगामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन विदर्भात होणार का, याबाबतच्या चर्चांना वेग आला आहे. घटनादुरुस्ती समितीची बैठक ३० जूनला, तर साहित्य महामंडळाची बैैठक १ जुलैैला होणार आहे. १ जुलैैच्या बैैठकीत स्थळ निवड समिती आणि मार्गदर्शन समिती गठित होणार आहे. विदर्भ साहित्य संघाकडे साहित्य महामंडळाच्या जबाबदारीचे हे शेवटचे वर्ष असल्याने संमेलन विदर्भात व्हावे, असा सूर साहित्य वर्तुळातून व्यक्त होत आहे.महाराष्ट्र साहित्य परिषदेकडे महामंडळ असताना सासवड, घुमान आणि ठाणे या ठिकाणी संमेलने आयोजित केली होती. महामंडळ विदर्भ साहित्य संघाकडे गेल्यानंतर डोंबिवली आणि बडोदा येथे संमेलने पार पडली. ८९ व्या संमेलनासाठी सुरुवातीला आपल्या कारकिर्दीतील शेवटचे संमेलन विदर्भातील हिवरे आश्रम हे स्थळ निश्चित करण्यात आले होते. आश्रमाच्या जागेवरुन वाद निर्माण झाल्याने बडोद्याची निवड करण्यात आली. त्यादृष्टीने मार्गदर्शन समिती आणि स्थळ निवड समितीच्या निवडीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. महामंडळाच्या कार्यकाळतील हे अखेरचे संमेलन तरी विदर्भात घेतले जावे, अशी विदर्भातील साहित्य रसिकांची अपेक्षा आहे. आजवरची साहित्य संमेलने पुणे-मुंबई आणि पश्चिम महाराष्टाभोवती फिरत राहिल्याने विदर्भाचा अनुशेष दूर व्हावा, या मागणीची दाखल घेत आगामी संमेलन निमंत्रण आलेल्या दोन स्थळांपैकी एका ठिकाणी होण्याची शक्यता असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
आगामी साहित्य संमेलन विदर्भात?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2018 4:51 AM