सोमेश्वरनगर : ते म्हणतात नां, जुन्या जाणत्या बुजूर्गांच्या नादाला कधीच लागू नये. कारण ही मंडळी कुुणाची कधी विकेट काढतील ते सांगता पण येणार नाही. निश्चितच त्यांनी चार पावसाळे आपल्यापेक्षा जास्त पहिलेले असतात. याचाच गमतीदार अनुभव बारामती तालुक्यातील काही 'पोट्टयां'नी घेतला.
बारामती तालुक्यातील येथील वाणेवाडी (मळशी)च्या आळंदीबाई मोहन सरतापे यांचं वय तसं पाहिलं तर ७२.पण आयुष्यभर कष्टाला मागे पुढे पाहता त्यांनी आपलं शरीर देखील उत्तमप्रकारे जपलं असं अगदी बिनधास्त म्हणता येईल. या वयात देखील त्यांनी नातवांचा हट्ट असा काही पुरवला की त्यांनी तोंडातच बोटं घातली. आजीची चेष्टा करणं त्यांना चांगलंच महागात पडलं...
वाणेवाडीच्या ७२ वर्षांच्या आळंदीबाई यांच्या नातवांनी त्यांना निरा डावा कालव्यात पोहण्याचा आग्रह केला. या वयात कुठं पोहणं बिणं म्हणत आजीने सुरूवातीला आधी स्पष्ट शब्दात पोट्ट्यांना झिडकारलंच. पण पोट्टे काही केल्या ऐकायचं नाव घेईना म्हटल्यावर आजीने असा काही हिसका दाखवत तब्बल दोन वेळा नीरा डावा कालवा आरपार केला.
वाणेवाडी अंतर्गत येणाऱ्या मळशी या ठिकाणी पाच फाटा, सोळा आंबा या ठिकाणी आळंदीबाई यांचा मुलगा त्यात्या सरतापे हा आपल्या मुलांना पोहायला घेऊन निरा डाव्या कालव्यावर घेवून आला होता. त्याच वेळी त्या मुलांची आज्जी शेतातून डोक्यावर सरपण घेऊन घरी निघाली होती. नातवांनी हाक दिली...ये आज्जी, ये पोहायला....आजी म्हटली नको बाबा वय झालंय आता...तुम्ही पोहा....नातू परत बोलला, ये गं आज्जी....आम्ही शिकवतो तुला पोहायला....आजीने डोक्यावरचं सरपणाचं ओझं खाली टाकलं अन् एका क्षणार्धात नातवांच्या आग्रहाखातर निरा डाव्या कालव्यात सूर मारला...७२ वर्षाच्या आजीचं पोहणं पाहून नातवं आश्चर्यचकित झाली.
७२ वर्षाच्या आजीने निरा डाव्या कालव्यात मारलेला सूरचा व्हिडिओ आज सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल होत असून आजीवर सगळीकडून कौतुकाचा तुफान वर्षाव होत आहे. कोरोना महामारीत स्वतःला फिट ठेवा हाच संदेश आजीने दिला आहे.
---------माझं माहेर सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील जाशी पळशी तसा हा दुष्काळी भाग, पावसाळ्यात कधीतरी ओढ्याला पाणी यायचं, आम्ही चौघी बहिणी वडिलांना सांगायचं सरपण आणायला निघालो आहे आणि दिवसभर पोहत बसायचो.- आळंदीबाई सरतापे