पुणे, दि. 23 - जॉन अब्राहमने एका निराधार मातेकडे पाठ फिरवली असून आपल्या मुलाच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्यानंतर त्याने मदतीचे आश्वासन न पाळल्याचा आरोप या महिलेने केला आहे.जॉन अब्राहम चालवीत असलेल्या दुचाकीची धडक बसून 2006 मध्ये एक तरुण जखमी झाला होता. अवघ्या 25 वर्षांच्या शाम दत्तू कसबे या तरुणाचा अपघातानंतर तिस-या वर्षीच मृत्यू झाला. दरम्यान, जॉनला बांद्रा न्यायालयाने अपघाताप्रकरणी शिक्षा सुनावली. त्याविरोधात त्याने सत्र न्यायालयात अपील केले. तेथेही त्याच्याविरोधात निकाल गेला. त्याने उच्च न्यायालयात धाव घेतली. दरम्यान शामच्या भावाचे 2008 साली निधन झाले. त्यामुळे त्यांची आई शारदा दत्तू कसबे एकट्या पडल्या. त्यांच्या पतीचे 2004 सालीच निधन झालेले होते. उच्च न्यायालयातील खटला मागे घेण्यासाठी जॉनने त्यांना मदतीचे आश्वासन दिले. वार्धक्यात तुमची काळजी घेईन असे त्याने सांगितले. त्यावर विश्वास ठेवून शारदा कसबे यांनी केस मागे घेण्याच्या कागदपत्रांवर सह्या केल्या. मात्र, त्यानंतर जॉनने त्यांच्याकडे सपशेल पाठ फिरवली. त्यांना कोणत्याही प्रकारची मदत अद्यापही त्याने केली नाही. सध्या पुण्यात रहात असलेल्या शारदा यांची स्थिती हलाखिची असून त्यांच्यासमोर जगायचे कसे हा मोठा प्रश्न आहे.
VIDEO- अभिनेता जॉन अब्राहमने का फिरवली निराधार मातेकडे पाठ? मदतीचे आश्वासन न पाळल्याचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2017 12:10 AM